दक्षिण आफ्रिकेत फलंदाजांचं पानिपत होत असताना भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. केप टाऊन आणि सेंच्युरिअनच्या कसोटीत आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीची धुळधाण उडाली होती. याचीच पुनरावृत्ती जोहान्सबर्गच्या मैदानावर पहायला मिळाली. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव १८७ धावांमध्ये आटोपला.
सध्या न्यूझीलंडमध्ये U-19 विश्वचषकाचं समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीने मात्र याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर सौरवने याबद्दल नापसंती दर्शवत आयसीसीला जोहान्सबर्गच्या खेळपट्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
@vikrantgupta73 @imVkohli @BCCI @ICC ..To play test cricket on this surface is unfair …saw it in NZ in 2003 …batsman have minimum chance ..icc should look into it
— Sourav Ganguly (@SGanguly99) January 24, 2018
पहिल्या डावात भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. यानंतर शेवटच्या फळीत भुवनेश्वर कुमारने केलेली फटकेबाजी वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सौरव गांगुलीच्या या वक्तव्यावर आता आयसीसी किंवा अन्य खेळाडू काय प्रतिक्रीया देतात हे पहावं लागणार आहे.