दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, आपल्या संघाची पाठराखण केली आहे. सामना सुरु होताना, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र कर्णधार विराट कोहलीने आपल्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
अवश्य वाचा – वर्नेन फिलँडरच्या वादाळात भारताची धूळधाण, केप टाऊन कसोटीत आफ्रिका ७२ धावांनी विजयी
“पहिल्या कसोटीसाठी संघ निवडताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्म लक्षात घेतला. रोहित शर्माने घरच्या मैदानावर तिनही प्रकारांमध्ये खेळताना धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध मालिकेतही रोहितने चांगली फलंदाजी केली होती. दुर्दैवाने अजिंक्य रहाणेला मागच्या वर्षात फारशा धावा करता आल्या नाही.” याच कारणासाठी अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलं.
अवश्य वाचा – धोनीच्या नावावर जमा असलेला विक्रम वृद्धीमान साहाकडून मोडीत
घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेचा आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे. वर्षभरापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. यावेळी चेतेश्वर पुजाराने २८० धावांसह पहिला क्रमांक, विराट कोहलीने २७२ धावांसह दुसरा क्रमांक आणि अजिंक्य रहाणेने २०९ धावांसह तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल करतो का हे पहावं लागणार आहे.