दक्षिण आफ्रिकेमध्ये १० दिवस आधी यायला हवे होते!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पश्चातबुद्धी झाली आहे. ‘‘नियोजित दौऱ्यापूर्वी १० दिवस आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये यायला हवे होते. वातावरणाशी जुळवून घ्यायला हवे होते. सराव सामना खेळून खेळपट्टय़ांचा अभ्यास करायला हवा होता, ’’असे भारताचे शास्त्री यांनी सोमवारी म्हटले.
‘‘मायदेशातील वातावरण आणि खेळपट्टय़ांबाबत आम्हाला पुरेशी माहिती आहे. त्यामुळे पिछाडी भरून काढण्याची करामत यापूर्वी आम्ही साधली आहे. मात्र परदेशातील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. दौरा सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये १० दिवस आधी येऊन सराव केला असता तर सांघिक कामगिरीमध्ये खूप फरक पडला असता,’’ असे शास्त्री म्हणाले.
भारताच्या कमकुवत बाबी परदेशामध्ये उघड होतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवांनंतर त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. भारताचा संघ २८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला. त्यानंतर एकही सराव सामना न खेळता ५ जानेवारीपासून थेट मालिकेत खेळला. तीन सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या विराट कोहली आणि सहकाऱ्यांसमोर सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की टाळण्याचे आव्हान आहे. प्रत्यक्ष दौऱ्यापूर्वी काही दिवस आधी यायला हवे होते, असे म्हटले तरी पराभवासाठी कुठलेही कारण देत नसल्याचे शास्त्री यांनी पुढे सांगितले. ते म्हणाले, ‘‘सराव सामना खेळायला मिळाला नाही, हे कारण पराभवासाठी देऊ इच्छित नाही. एकाच खेळपट्टीवर दोन्ही संघ खेळले. दोन्ही कसोटी सामन्यांत प्रतिस्पध्र्याचे प्रत्येकी २० बळी बाद करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केले होते. मात्र, आमचे गोलंदाज अपयशी ठरले. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीमध्ये आमची आघाडीची फळी बहरली तर हा सामनाही रंगतदार होईल.’’
प्रमुख कसोटीपटूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लवकर का पाठवले नाही, असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘‘आफ्रिका दौऱ्यासाठी काही प्रमुख कसोटीपटूंना लवकर पाठवण्याचा विचार होता. मात्र अशामुळे संघ विभागला जातो, असे काहींचे म्हणणे पडले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यांपूर्वी किमान दोन आठवडे आधी संघ तिथे पोहोचायला हवा, असे माझे मत आहे.’’
रहाणेला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन
अनुभवी अजिंक्य रहाणेला पहिल्या दोन कसोटीमध्ये न खेळवण्याच्या निर्णयाचे शास्त्री यांनी समर्थन केले आहे. ‘रहाणेला न खेळवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता. पहिल्या कसोटीमध्ये खेळून अजिंक्य अपयशी ठरला असता तर रोहित शर्माला का खेळवले नाही, असा प्रश्न तुम्ही विचारला असता. मायदेशात चांगली कामगिरी केल्याने रोहितला प्राधान्य देण्यात आले,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.