दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वर्नेन फिलँडर, मॉर्ने मॉर्कल, कगिसो रबाडा यासारख्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर गुडघे टेकलेल्या भारतीय फलंदाजांसाठी, भारताचे माजी फलंदाज चंदु बोर्डे धावून आले आहेत. आफ्रिकन गोलंदाजांसमोर आपला टिकाव लागायचा असेल भारतीय फलंदाजांनी क्रिजच्या थोडं पुढे उभं राहून उजव्या यष्टीमागचे चेंडू सोडून द्यायला हवेत असा सल्ला बोर्डे यांनी भारतीय संघाला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केप टाऊन कसोटी दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७२ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मन्सूर अली खान पतौडी यांच्या काळात भारतीय संघाच्या उप-कर्णधारपदाची धुरा सांभाळणारे चंदु बोर्डे हे आपल्या फलंदाजीसाठी परिचीत होते. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोर्डे यांनी आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीचा भारतीय संघ पुनरागमन करेल असा आत्मविश्वासही दर्शवला.

“सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे. पहिल्या कसोटीत भारताचे फलंदाज यष्टीमागे झेल देत नाहीतर स्लिपच्या खेळाडूकडे झेल देत माघारी परतले. यामुळे आफ्रिकेत खेळताना उजव्या यष्टीमागचे चेंडू सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे.” ८३ वर्षीय बोर्डेंनी मुलाखतीत आपलं मत मांडलं. उजव्या यष्टीबाहेरचे चेंडू सोडण्यासोबत भारतीय फलंदाजांनी क्रिजच्या पुढे येऊन उभं राहून चेंडू स्विंग होणं टाळायला हवं. त्यामुळे आपल्या तंत्रात बदल केल्यास भारतीय संघ चांगली कामगिरी करेल असंही बोर्डे म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of south africa 2018 leave out side off stump deliveries advice former indian cricketer chandu borde