केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात महत्वाचे बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. सलामीवीर शिखर धवन ऐवजी लोकेश राहुलला संघात जागा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असताना, यष्टीरक्षणाची जबाबदारीही पार्थिव पटेलकडे सोपवण्यात येऊ शकते.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीतही अजिंक्य रहाणेला जागा नाहीच?

केप टाऊन कसोटीत भारताने ५ फलंदाज आणि ५ गोलंदाजांना संघात जागा दिली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीचा डाव कोलमडला. त्यातच अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी फलंदाजाला संघात जागा न दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यातच १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघ वृद्धीमान साहाऐवजी पार्थिव पटेलला संघात जागा देण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

कसोटी सामना सुरु होण्याआधी आज पार्थिव पटेलने सेंच्युरिअनच्या मैदानात यष्टीरक्षणाचा सराव केला. यावेळी वृद्धीमान साहा देखील पटेलसोबत मैदानात उपस्थित होता, मात्र त्याने सरावादरम्यान कोणत्याही प्रकारे पॅड आणि ग्लोव्ह्ज घातलेली नव्हती. याचसोबत अजिंक्य रहाणेनेही रोहित शर्मासोबत स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव केला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीआधी भारत अंतिम संघात कोणाला स्थान देणार यावरुन क्रीडा प्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

केप टाऊन कसोटीत वृद्धीमान साहाने यष्टीरक्षणात कमालीची कामगिरी केली. या कसोटीत साहाने महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मोडीत काढला. मात्र इतर खेळाडूंप्रमाणे फलंदाजीत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे सेंच्युरिअन कसोटीसाठी भारत कोणता संघ निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader