दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात सारंकाही आलबेल असल्याचं दिसतं नाहीये. केप टाऊन कसोटीत स्टेन, फिलँडर, मॉर्कल यांच्या माऱ्यासमोर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आफ्रिकेतल्या जलद आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची उडणारी भंबेरी पाहिल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही भारतीय फलंदाजांचे कान टोचले आहेत.
अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
आफ्रिकेविरुद्ध तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाजीदरम्यान तुमच्यामध्ये प्रचंड संयम असण्याची गरज आहे. यानंतर मैदानात जास्तीत-जास्त वेळ टिकून राहत मोठी भागीदारी रचली तर आफ्रिकेचे गोलंदाजही दडपणाखाली येऊ शकतात. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकर बोलत होता. “परदेशात तुम्ही वातावरण आणि खेळपट्टीशी कसं जुळवून घेताय यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. ज्या गोष्टी तुम्हाला भारतात मिळत होत्या, त्या परदेशात मिळणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेत पहिलं २५ षटकं गोलंदाज सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. कारण खेळपट्टी या काळात त्यांना साथ देते. या काळात फलंदाजांनी संयम दाखवणं गरजेचं आहे. जे फटके तुम्ही भारतात खेळता तसे फटके तुम्ही आफ्रिकेच्या मैदानांवर नाही खेळू शकत”, असं म्हणत सचिनने भारतीय फलंदाजांची कानउघडणी केली.
अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला माजी खेळाडूचा कानमंत्र
केप टाऊनमध्ये भारतीय फलंदाजांनी संयम दाखवला नाही. जर फलंदाजीदरम्यान भारतीय फलंदाज संयमाने खेळले असते तर ५० ते ८० व्या षटकांच्या दरम्यान त्यांना भरपूर धावा मिळाल्या असत्या. याचप्रमाणे सेंच्युरिअनच्या मैदानावर भारतीय डावाला आकार येण्यासाठी सलामीच्या फलंदाजांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असा अंदाजही सचिनने वर्तवला. पहिली २५ षटकं सांभाळून खेळली आणि ५० व्या षटाकापर्यंत धावा वाढवण्याकडे भर दिल्यास भारतीय संघ आफ्रिकेला बॅकफूटला ढकलू शकतो असंही सचिन तेंडुलकर म्हणाला.
अवश्य वाचा – रहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड