पहिल्या ३ सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर जोहान्सबर्ग येथील चौथ्या वन-डे सामन्यात, भारताचा सलामीवीर शिखर धवनने ऐतिहासीक खेळी केली आहे. आपल्या कारकिर्दीचा १०० वा सामना खेळणाऱ्या शिखर धवनने आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शिखरचं वन-डे कारकिर्दीतलं हे १३ वं शतकं ठरलं. जोहान्सबर्गमध्ये आज वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, यानुसार सामन्यात विजांच्या कडकडाटांनी व्यत्यय आणल्याामुळे पंचांनी सामना थांबवला. यावेळी शिखर धवन १०७ धावांवर नाबाद राहून खेळत होता.
मालिकेत तीन वेळा शतकाची संधी हुकल्यानंतर धवनने अखेर शतकाला गवसणी घातली आहे. पहिल्या ३ सामन्यांपैकी दोन सामन्यात शिखरने अर्धशतकी खेळी केली होती. यामुळे चौथ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर शिखर धवनने आपल्या नेहमीच्या शैलीत दोन्ही हात पॅव्हेलियनकडे उंचावत आपल्या सहकाऱ्यांना अभिवादन केलं. वादळ आणि विजांचं संकट टळून गेल्यानंतर शिखर धवन आधीच्या धावसंख्येत अवघ्या २ धावांची भर घालून माघारी परतला.
१०० वन-डे सामने खेळल्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा पटकावण्याचा बहुमानही शिखर धवनने पटकावला आहे. या यादीमध्ये आफ्रिकेचा हाशिम आमला शिखर धवनच्या पुढे आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने रोहित शर्माला लवकर गमावलं, मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.