दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला वगळण्याच्या निर्णयावरुन, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनावर चांगलीच टीका झाली होती. मात्र आता आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी खुद्द विराट कोहलीच मैदानात उतरलेला आहे. “जी लोकं (खराब कामगिरीवरुन) अजिंक्य रहाणेला वगळण्याची मागणी करत होती, तीच लोकं आता त्याला संघात घेण्यासाठी ओरडत आहेत.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विराट बोलत होता.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीतही अजिंक्य रहाणेला जागा नाहीच?

“गेल्या ५ दिवसांमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी पटापट बदलत आहेत, ते पाहून मला खरचं हसायला येतंय. पहिल्या कसोटीआधी अनेक जणांना अजिंक्य (खराब कामगिरीमुळे) संघात नको होतो. मात्र एका पराभवानंतर लगेच लोकं अजिंक्यला संघात घ्या असं म्हणायला लागली आहेत.” दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या म्हणजेच १३ जानेवारी रोजी सेंच्युरिअरनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – रहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड

प्रत्येक सामन्याआधी आम्ही खेळपट्टी आणि खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन संघ निवडत असतो. जर एखादा खेळाडू विशिष्ट खेळपट्टीवर खेळण्यास योग्य असेल तर त्याला संघात जागा मिळते. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्माची निवड ही त्याचा फॉर्म पाहूनच झाली होती. कोण काय विचार करतं आणि कोणाला काय वाटेल यावरुन आम्ही संघ निवडत नाही, असा टोलाही विराटने टीकाकारांना लगावला.

अवश्य वाचा – भारतीय संघात बदलाचे वारे, दुसऱ्या कसोटीत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार्थिव पटेलकडे?

“अजिंक्य रहाणे हा एक गुणी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. भारताबाहेर प्रत्येक देशात खेळताना अजिंक्य कसलेल्या फलंदाजासारखा खेळतो. त्यामुळे अजिंक्यला संघात परत कधीच संधी मिळणार अशातला भाग नाही. अजिंक्य अजुनही संघात पुनरागमन करु शकतो, आणि दुसऱ्या कसोटीत कोणाला स्थान मिळेल याचा निर्णय संघ व्यवस्थापन सरावादरम्यान घेईल.” रहाणेच्या निवडीवरुन अजिंक्य रहाणेने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा –  दक्षिण आफ्रिकेत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला माजी खेळाडूचा कानमंत्र

Story img Loader