जोहान्सबर्ग येखील वन-डे सामन्यात भारतावर ५ गडी राखून मात करत आफ्रिकेने ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेला २८ षटकांत २०२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यातचं सामन्यात पावसाने आणलेला व्यत्यय आणि भारतीयांनी डेव्हिड मिलरला दिलेलं जीवदान या जोरावर आफ्रिकेने चौथ्या सामन्यात बाजी मारली.
अवश्य वाचा – ….म्हणून आम्ही सामना गमावला – शिखर धवन
या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच नाराज झालेला आहे. चांगली फलंदाजी करुनही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमी पडल्याने सामना गमवावा लागल्याचं विराटने बोलून दाखवलं. “ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेने सामन्यात पुनरागमन केलं आहे ते पाहता आम्ही हा सामना जिंकूच शकलो नसतो. किंबहुना त्या योग्यतेचा खेळच आम्ही केला नाही. पावसामुळे अखेरच्या सत्रात गणितं बदलतं गेली आणि आमचे खेळाडू वातावरणाशी जुळवून घेण्यात कमी पडले.” पत्रकारांशी बोलताना विराट कोहलीने आपला पराभव मान्य केला.
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विराट कोहली आणि शतकवीर शिखर धवन यांच्यातल्या शतकी भागीदारीच्या जोरावर चांगली सुरुवात केली होती. मात्र सामन्यात कडाडणाऱ्या विजांनी व्यत्यय आणला आणि खेळ थांबवावा लागला. यानंतर लयीत असणाऱ्या भारतीय फलंदाजांची अचानक त्रेधातिरपीट उडालेली पहायला मिळाली. भारताची मधली फळी आफ्रिकेच्या जलदगती माऱ्यासमोत तग धरु शकली नाही. ज्यामुळे भारतीय संघाला ५० षटकांमध्ये २८९/७ या धावसंख्येवर समाधान मानावं लागलं.
सामन्यात दुसऱ्यांदा पाऊस पडल्यानंतर चेंडू सारखा ओला होत होता. त्यातच भारतीय फिरकीपटूंनी स्वैर मारा करत अनेक अवांतर धावा दिल्या. या सर्व गोष्टींचा आफ्रिकेला चांगलाच फायदा झाला. सध्या भारत मालिकेत ३-१ अशा आघाडीवर असला तरीही यापुढे दक्षिण आफ्रिका दोन्ही सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवू शकते. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ काय रणनिती आखतो हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?