नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोठे वक्तव्य केले आहे. भारताने आफ्रिकेविरुद्धची वनडे आणि कसोटी मालिका गमावली. भारताचा कसोटी मालिकेत १-२ आणि एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव झाला. मात्र, वेगवान गोलंदाज शमी हा केवळ कसोटी संघाचा भाग होता. अशा स्थितीत त्याचे विधान केवळ कसोटी मालिकेबाबत आले आहे. संघाने पहिली कसोटी जिंकली, मात्र शेवटच्या दोन कसोटीत पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. संघाला आता फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेकडून कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.
”आमची फलंदाजी चांगली झाली नव्हती. यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले”, असे मोहम्मद शमीने टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शमी म्हणाला, ”आमच्या गोलंदाजी विभागाने चांगली कामगिरी केली हे विसरू नका. गोलंदाज बहुतांश प्रसंगी चांगली कामगिरी करत आहेत. हा एक सकारात्मक पैलू आहे.”
हेही वाचा – रोहित नेतृत्वासाठी सज्ज ; विंडीजविरुद्धच्या मालिकांसाठी अश्विन, भुवनेश्वरला वगळण्याची शक्यता
शमी म्हणाला, ”यावेळी आमची फलंदाजी थोडी खराब होती, त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. दोन्ही सामन्यात आमच्याकडे ५०-६० धावा झाल्या असत्या, तर आम्हाला विजयाची मोठी संधी मिळाली असती. लवकरच या उणीवा दूर केल्या जातील.”