श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत रविंद्र जाडेजाने सामन्यात आपली छाप सोडली. यासाठी त्याला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं, मात्र सामन्यादरम्यान आयसीसी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जाडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पल्लकेले कसोटी रविंद्र जाडेजा खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी आज बीसीसीआयने अक्षर पटेलची संघात निवड केली आहे.

अवश्य वाचा – सामनावीराचा किताब मिळवूनही श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जडेजावर बंदी

कोलंबो कसोटीत आपलं षटक पूर्ण केल्यानंतर श्रीलंकन फलंदाज मलिंदा पुष्पकुमाराच्या दिशेने जोरात चेंडु फेकला. जाडेजाची ही कृती धोकादायक ठरवत, पंचानी त्याला याबद्दल समज दिली, आणि चौथ्या दिवशी भारताने सामना जिंकल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई केली.

तिसऱ्या कसोटीत रविंद्र जाडेजाच्या ऐवजी संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने संघात अक्षर पटेलची निवड केली आहे. याआधी ३० वन-डे आणि ७ टी-२० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर अक्षर पटेलची अखेर भारतीय कसोटी संघात निवड झालेली आहे.

श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने सध्या २-० अशी जिंकलेली आहे. जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई केली असली तरीही आगामी वन-डे आणि टी-२० सामन्यात त्याचं भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा अव्वल

Story img Loader