हार्दीक पांड्याने कँडी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतकं साजरं केलं. गेल्या काही सामन्यांमधला हार्दीक पांड्याची कामगिरी पाहता, त्याला श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात जागा देण्यात आली. आणि पांड्यानेही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत फलंदाजी आणि गोलंदाजीत भरीव कामगिरी केली. आज मैदानात शतक झळकावल्यानंतर हार्दीक पांड्याने आपले दोन्ही हात वर करुन ड्रेसिंग रुमच्या दिशेने ‘V’ चिन्ह दाखवत आपल्या सहकाऱ्यांना एक खास संदेश दिला. सामना संपल्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या या हटके सेलिब्रेशनची चर्चा रंगत होती.
पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शिखर धवनने शतक झळकावल्यानंतरही अशाच पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला होता. याबद्दल विचारलं असताना शिखर धवन म्हणाला, ” माझ्या सहकाऱ्यांनी माझं एक टोपणं नाव ठेवलं आहे. त्यांना माझ्या शतकानंतर खास संदेश देण्यासाठी मी ती खूण माझ्या सहकाऱ्यांना करुन दाखवली.” मात्र सहकाऱ्यांनी ठेवलेलं टोपण नाव सांगायला शिखर धवनने नकार दिला.
हार्दीक पांड्याने दुसऱ्या दिवशी शतक झळकावत संघाला धावांचा डोंगर उभा करायला मदत केली. मात्र शिखर धवनला त्याच्या सहकाऱ्यांनी नेमकं काय टोपण नाव ठेवलं असेल याची उत्सुकता आता सोशल मीडियावर क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये वाढत चाललेली आहे. कारण कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच टाईमनंतर ड्रेसिंग रुममध्ये परतताना लोकेश राहुलनेही अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं.
शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही आपल्या सेलिब्रेशनचा फोटो टाकत आपल्या सहकाऱ्यांना खास संदेश दिला.