कोलंबो कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या पहिल्या डावात अष्टपैलू धनंजय डिसील्वाचा त्रिफळा उडवत सर्वात आणखी एका विक्रमची आपल्या नावे नोंद केली. रविंद्र जाडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. केवळ ३२ कसोटी सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाजही ठरला आहे. पहिल्या डावात जाडेजाने आपल्या फिरकीने २ फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

श्रीलंकेच्या पहिल्या डावात जाडेजाने सर्वप्रथम रविंद्र जाडेजाने लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलचा अडथळा दूर केला. यानंतर मैदानावर आलेल्या धनंजय डिसील्वाचा त्रिफळा उडवत जाडेजाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सच्या नावे हा विक्रम होता. जॉन्सनने ३४ कसोटींमध्ये १५० विकेट घेतल्या होत्या. मात्र जाडेजाने आपल्या ३२ व्या कसोटीतच हा विक्रम साधला आहे.

सर्वात जलद १५० बळी घेणारे डावखुरे गोलंदाज –

१. रविंद्र जाडेजा ( भारत ) – ३२ कसोटी
२. मिचेल जॉन्सन ( ऑस्ट्रेलिया ) – ३४ कसोटी
३. बिल जॉनस्टन ( ऑस्ट्रेलिया ) – ३५ कसोटी
४. अॅलन डेव्हिडसन ( ऑस्ट्रेलिया ) – ३७ कसोटी
५. डेरेक अंडरवुड ( इंग्लंड ) – ४० कसोटी
६. विनु मंकड ( भारत ) – ४० कसोटी
७. टोनी लॉक ( इंग्लंड ) – ४० कसोटी
८. ट्रेंट बॉल्ट ( न्यूझीलंड ) – ४० कसोटी
९. रंगना हेरथ – ( श्रीलंका ) – ४० कसोटी
१०. बिशनसिंह बेदी ( भारत ) – ४१ कसोटी
११. वासिम अक्रम ( पाकिस्तान ) – ४१ कसोटी

सर्वात जलद १५० बळी घेणारे भारतीय गोलंदाज –

१. रविचंद्रन अश्विन – २९ कसोटी
२. रविंद्र जाडेजा – ३२ कसोटी
३. इरापल्ली प्रसन्ना – ३४ कसोटी
४. अनिल कुंबळे – ३४ कसोटी
५. हरभजन सिंह – ३५ कसोटी
६. बी.एस.चंद्रशेखर – ३६ कसोटी
७. कपील देव – ३९ कसोटी

या कामगिरीमुळे रविंद्र जाडेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पहिल्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं असलं, तरीही दुसऱ्या डावात लंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगली लढत दिली आहे. मेंडीस आणि करुणरत्नेने शतकी भागीदारी केल्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस लंकेने सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज लंकेला लवकर बाद करुन डावाने विजय मिळवतात का हे पहावं लागणार आहे.