भारतीय क्रिकेटसंघातला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा रविंद्र जाडेजा हा त्याच्या खेळासोबत हटके स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. शतक झळकावल्यानंतर एखाद्या पट्टीतल्या तलवारबाजाप्रमाणे बॅट फिरवणं आतापर्यंत सर्वांनी पाहिलं असेल. मात्र श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ड्रेसिंग रुममध्ये रविंद्र जाडेजाने दिलरुवान पेरेराच्या गोलंदाजीची नक्कल केली आणि ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
@imjadeja is making joke on someone bowling action pic.twitter.com/r1DhJhnRKO
— ABHISHEK PANDEY (@abhishkpandey29) July 26, 2017
गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ चेतेश्वर पुजारानेही शतक झळकावत लंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणलं. भारताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेरथने सर्वप्रकारे प्रयत्न करुन पाहिले, मात्र नुवान प्रदीपचा अपवाद वगळता पहिल्या दिवशी कोणालाही यश मिळालं नाही. मग रंगना हेरथने दिलरुवान पेरेराचा पर्यायही आजमावून पाहिला, मात्र त्यालाही यश मिळालं नाही.
याचदरम्यान जाडेजाने दिलरुवानच्या अनोख्या शैलीतल्या गोलंदाजीची नक्कल केली. ज्याला भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री, सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर आणि कर्णधार विराट कोहली यांनीही भरभरुन दाद दिली. पहिल्या दिवशी दिलरुवान पेरेराने २५ षटक टाकली, मात्र त्याला एकही भारतीय फलंदाजाला बाद करता आलं नाही.
पहिल्या कसोटीत पुजारा आणि धवनच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत असल्यामुळे, दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना लवकर बाद करण्यात श्रीलंकेचे गोलंदाज यशस्वी ठरतात का हे पहावं लागेल.