पहिल्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजीला लवकर गुंडळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं, तरीही दुसऱ्या डावात मात्र भारतीय फलंदाजांना चांगलीच झुंज द्यावी लागली. कुशल मेंडीस आणि दिमुथ करुणरत्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी केली आणि सामन्यात लंकेचं आव्हान कायम ठेवलं.

रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेण्याची अश्विनची ही २६ वी वेळ ठरली. या बाबतीत अश्विनने भारताच्या हरभजन सिंहला मागे टाकलंय. आजच्या दिवसात कोलंबोच्या मैदानात १० विक्रमांची नोंद करण्यात आली.

– ५० पेक्षा कमी कसोटींमध्ये २ हजार धावा आणि २०० कसोटी बळी घेण्याचा विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावे, आतापर्यंत कोणताही खेळाडूला हा विक्रम साधता आलेला नाहीये. याआधी सर रिचर्ड हेडली यांनी ५४ कसोटींमध्ये हा विक्रम केला होता. मात्र अश्विनने ५१ कसोटींमध्ये हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

– पहिल्या डावात श्रीलंका ४३९ धावांनी पिछाडीवर होती, लंकेच्या इतिहासातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी पिछाडी ठरली आहे.

– सर्वात जलद १५० बळी घेणारा रविंद्र जाडेजा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी रविचंद्रन अश्विनच्या नावे हा विक्रम आहे. जाडेजा या सामन्यात सर्वात जलद १५० बळी घेणारा डावखुरा गोलंदाजही ठरला आहे.

– श्रीलंकेत पाहुण्या संघाने उभारलेली ही सर्वाधीक तिसरी धावसंख्या आहे. याआधी भारतानेच २००९ साली गॉल कसोटीत ७०७ धावांचा डोंगर उभा केला होता.

– पहिल्या डावात भारताची ही तिसरी सर्वात मोठी आघाडी ठरली. याआधी २००७ साली ढाका कसोटीत बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात भारताला ४९२ धावांची आघाडी मिळाली होती.

– घरच्या मैदानाबाहेर भारताच्या सहा फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा काढण्याची ही दुसरी वेळ ठरली.

– कुशल मेंडीस श्रीलंकेकडून फॉलोऑन स्विकारल्यानंतर शतक ठोकणारा नववा फलंदाज ठरला. याव्यतिरीक्त मेंडीस भारताने फॉलोऑन दिल्यानंतर शतक ठोकणारा १५ वा फलंदाज ठरलाय.

२६ – ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेण्याची रविचंद्रन अश्विनची ही २६ वी वेळ. याआधी हा विक्रम हरभजन सिंहच्या नावावर होता. त्याने २५ वेळा ही किमया साधली आहे. या यादीत अनिल कुंबळे पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने ३५ वेळा ही किमया साधली आहे.

८१ – २४ कसोटी सामन्यांनंतर मोहम्मद शमीने घेतलेल्या विकेट, असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय जलदगती गोलंदाज ठरलाय.

१९१ – फॉलोऑन स्विकारल्यानंतर कुशल मेंडीस आणि दिमुथ करुणरत्ने यांच्यात १९१ धावांची भागीदारी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.