India vs Sri Lanka Series Revised schedule announced : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. येथे टीम इंडिया ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. या दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे टी-२० आणि केएल राहुलकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. तत्पूर्वी या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. मात्र, त्यात शनिवारी बदल करण्यात आला आहे.
२७ जुलैपासून टी-२० मालिका होणार सुरुवात –
बीसीसीआयने अधिकृत घोषणा करून ही माहिती दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता २७ जुलैपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे. यापूर्वी २६ जुलैला म्हणजे एक दिवस आधी टी-२० मालिकेला सुरूवात होणार होती. पण आता २७ जुलैपासून सुरूवात होणार आहे. दुसरा सामना २८ जुलै ऐवजी २९ जुलै आणि तिसरा सामना २९ जुलै ऐवजी ३० जुलैला खेळवला जाईल. टी-२० मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले येथील स्टेडियमवर खेळवले जातील.
२ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात –
त्याचप्रमाणे वनडे मालिकेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. आता एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसरा सामना ४ ऑगस्टला तर तिसरा सामना ७ ऑगस्टला होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. सुरुवातीला १ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार होती. दुसरा सामना ४ ऑगस्टला आणि तिसरा सामना ७ ऑगस्टला होणार होता.
मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता आणि एकदिवसीय मालिकेचे सामने दुपारी २.३० वाजता खेळवले जातील. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा हा पहिलाच दौरा असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, त्यांना वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.
हेही वाचा – Ricky Ponting : दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कोच; खास पोस्टसह पॉन्टिंगला अलविदा
टीम इंडियाचे श्रीलंका दौऱ्याचे सुधारीत वेळापत्रक –
पहिला टी-२० सामना, २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार), पल्लेकेले स्टेडियम
दुसरा २० सामना, २८ जुलै, संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
तिसरा टी-२० सामना, ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो