गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेवर मात करत आपल्या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपापल्या परिने विजयात हातभार लावला, मात्र कसोटीत पदार्पण केलेल्या हार्दिक पांड्याने केलेल्या कामगिरीनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या डावात पांड्याने अर्धशतकी खेळी करत, १ बळीही घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स करंडक आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या कामगिरीच्या जोरावर पांड्याची श्रीलंका दौऱ्यात निवड झाली होती. पहिल्याच कसोटीत मिळालेल्या संधीचा पांड्यानेही पुरेपूर फायदा करुन घेतला. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीही त्याच्यावर सध्या खुश आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, कोहलीने पांड्याचं तोंडभरुन कौतुक केलं. “पांड्या हा भारताचा बेन स्टोक्स बनू शकतो”, असं म्हणतं कोहलीने पांड्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

फिरकीपटू कुलदीप यादवला वगळून हार्दीक पांड्याला पहिल्या कसोटीत जागा देण्यात आली होती. पांड्या हा भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा २८९ वा खेळाडू ठरला आहे. पांड्याच्या संघातल्या समावेशाने मधल्या फळीत असणारी फलंदाजांची कमतरता, तसेच अडचणीच्या वेळी लागणाऱ्या गोलंदाजाची कमतरताही भरुन निघेल असं अनेक क्रीडा समीक्षकांनी म्हणलंय. त्यामुळे आगामी काळात पांड्याला संघात अधिकाधीक जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

आयपीएल, चॅम्पियन्स करंडक आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात पांड्याने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी होती. त्यामुळे २३ वर्षीय पांड्यासाठी भारतीय संघाची कवाड लवकरच खुली झाली. त्यातचं चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेल्या खेळीमुळे तो सर्वांच्याच चर्चेत आला होता. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये पांड्या मैदानात कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of sri lanka hardik pandya can be our ben stokes says captain virat kohli