Indian Team Indoor Practice : इंग्लंड विरुद्धची टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकून भारतीय संघ कॅरेबियन बेटांवरती गेला आहे. तिथे वेस्ट इंडीज विरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांच्या दोन मालिका भारतीय संघाला खेळायच्या आहेत. शुक्रवारपासून (२२ जुलै) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. मात्र, त्रिनिदादमधील पावसाने भारताच्या सराव सत्रात अडथळ आणला आहे.
भारतीय संघ बुधवारी (२० जुलै) त्रिनिदादला पोहोचला आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी मिळालेल्या वेळेचा फायदा करून घेण्यासाठी संघ व्यवस्थापनाने सराव सत्राचे आयोजन केले होते. मात्र, त्रिनिदादमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर उपाय म्हणून प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इनडोअर नेटमध्ये संघाचा सराव घेतला. यावेळी संघातील सर्व खेळाडू कसून सराव करताना दिसले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेतील तिन्ही सामने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांनी आतापर्यंत आपापसात १३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ६७ वेळा तर कॅरेबियन संघाने ६३ वेळा विजय मिळवले आहेत. सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.