भारतीय भूमीवर बहरणारा श्रावण तर परदेशी खेळपट्टय़ांवर पानझडीचा शिशिर ही भारतीय संघाची कहाणी पुन्हा एकदा समोर आली. भारताची फलंदाजीची फळी वेगवान गोलंदाजांसमोर गळपटली आणि न्यूझीलंडने पहिल्या कसोटीवर सहजगत्या नियंत्रण मिळवले. परंतु दुसऱ्या दिवसाचे खरे श्रेय जाते ते संघनायक ब्रेन्डन मॅक्क्युलमला आणि त्याच्या नेत्रदीपक द्विशतकी खेळीला.
मॅक्क्युलमने २२४ धावांची दणदणीत खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ५०३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या खात्यावर ६ बळी जमा होते, परंतु किवींच्या धावांच्या डोंगरापुढे ते खुजे वाटत होते. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारतीय संघ ४ बाद १३० असा झगडत होता. रोहित शर्मा (६७*) आणि अजिंक्य रहाणे (२३*) ही मुंबईकर जोडी मैदानावर निर्धाराने उभी होती. भारतीय संघ न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून सध्या ३७३ धावांनी पिछाडीवर आहे, तर फॉलो-ऑन वाचवण्यासाठी त्यांना १७४ धावांची आवश्यकता आहे.
भारताची आघाडीची फळी क्षणार्धात कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिखर धवन (०), चेतेश्वर पुजारा (१) आणि विराट कोहली (४) यांनी ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदीच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करल्यामुळे भारताची ३ बाद १० अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मुरली विजयने (२६) भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु नील वॉगनरने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे भारताची ४ बाद ५१ अशी अवस्था झाली. त्यानंतर रोहित-रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वूपर्ण भागीदारी रचली.
दक्षिण आफ्रिकेत चाचपडणाऱ्या रोहितने आत्मविश्वासाने खेळत १०२ चेंडूंत ८ चौकार आणि केन विल्यम्सला मारलेल्या षटकारानिशी आपली खेळी फुलवली. भारत कठीण स्थितीत असताना रोहितने सुरुवात सावधपणे केली. २५व्या चेंडूला प्रथमच चेंडू सीमापार धाडला. विजयसोबत त्याने ४१ धावांची छोटेखानी भागीदारी केली.
विजय माघारी परतल्यावर रोहितने आक्रमणाचे हत्यार अमलात आणले. वॉगनरच्या षटकात त्याने तीन चौकार ठोकले. पहिला पूल, दुसरा कव्हरच्या दिशेने आणि तिसरा स्लिपच्या डोक्यावरून चौकार त्याने मारला. वॉगनरच्या आणखी एका षटकात त्याने कव्हर ड्राइव्ह खेचला, तर साऊदीला मिड-ऑफच्या दिशेने त्याने चौकार ठोकला. रोहितच्या झुंजार खेळीमधील आठपैकी सहा चौकार त्याने वॉगनरला मारले.
त्याआधी, ब्रेन्डन मॅक्क्युलमच्या ३०७ चेंडूंतील २२४ धावांच्या खेळीने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या खेळीत २९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्यामुळेच न्यूझीलंडने ५०३ धावा उभारल्या. भारताकडून इशांतने १३४ धावांत ६ बळी घेतले.
मॅक्क्युलमचे हे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले. दोन किंवा अधिक द्विशतके झळकावणारा मॅक्क्युलम हा चौथा किवी फलंदाज ठरला आहे.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. खान १३, हमिश रुदरफोर्ड झे. रहाणे गो. इशांत ६, केन विल्यम्सन झे. धोनी गो. खान ११३, रॉस टेलर झे. जडेजा गो. इशांत ३, ब्रेन्डन मॅक्क्युलम झे. जडेजा गो. इशांत २२४, कोरे अँडरसन पायचीत गो. इशांत ७७, बी जे वॉटलिंग झे. धवन गो. इशांत १, टिम साऊदी त्रिफळा गो. शमी २८, इश सोधी झे. रोहित गो. इशांत २३, नील वॉगनर झे. कोहली गो. जडेजा ०, ट्रेंट बोल्ट नाबाद १, अवांतर (बाइज १, लेगबाइज ५, वाइड ५, नोबॉल ३) १४, एकूण १२१.४ षटकांत सर्व बाद ५०३.
बाद क्रम : १-१९, २-२३, ३-३०, ४-२५१, ५-३८४, ६-३९८, ७-४३४, ८-४९०, ९-४९५, १०-५०३.
गोलंदाजी : मोहम्मद शमी २८-६-९५-१, झहीर खान ३०-२-१३२-२, इशांत शर्मा ३३.४-४-१३४-६, रवींद्र जडेजा २६-१-१२०-१, विराट कोहली १-०-४-०, रोहित शर्मा ३-०-१२-०.
भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. विल्यम्सन गो. बोल्ट ०, मुरली विजय त्रिफळा गो. वॉगनर २६, चेतेश्वर पुजारा झे. वॉटलिंग गो. बोल्ट १, विराट कोहली झे. फुल्टन गो. साऊदी ४, रोहित शर्मा खेळत आहे ६७, अजिंक्य रहाणे खेळत आहे २३, अवांतर (बाइज ५, लेगबाइज १, नोबॉल ३) ९, एकूण ३९ षटकांत ४ बाद १३०.
बाद क्रम : १-१, २-३, ३-१०, ४-५१.
गोलंदाजी : बोल्ट १०-१-२०-२, साऊदी १२-३-२७-१, अँडरसन २-०-९-०, वॉगनर ७-०-४६-१, सोधी ६-०-१३-०, विल्यम्सन २-०-९-०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे २० बळी घेण्याची क्षमता असणारे गोलंदाज आमच्याकडे आहेत. त्यांना आक्रमण करण्यासाठी पुरेशा धावा आम्ही केल्या आहेत. ३ बाद ३० अशा स्थितीतून ५०० धावा करू असे वाटले नव्हते. चेंडू थोडासा थांबून येत होता, त्यामुळे फलंदाजी करणे सोपे नव्हते. पुजाराला झटपट बाद करणे निर्णायक ठरले. तो खेळपट्टीवर नांगर टाकून संयमी खेळी करू शकतो. शनिवारी सकाळच्या सत्रात गोलंदाजी करताना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.  -ब्रेन्डन मॅक्क्युलम

खेळपट्टीपेक्षाही नवा चेंडू दोन्ही संघांसाठी घातक ठरत आहे. दोन्ही डावांचा अभ्यास केला तर नव्या चेंडूसह गोलंदाजांनी करामत केली आहे. खेळपट्टी किंवा वातावरणापेक्षा नवीन चेंडूच निर्णायक ठरला आहे. सुरुवातीला हा चेंडू जास्त स्विंग होतो आणि जुना झाल्यानंतर त्याचा सामना करणे सोपे होते. म्हणूनच भारताचे फलंदाज झटपट बाद झाले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे चेंडू स्विंग होत होते. आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचा सामना करायला हवा होता. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मोठी भागीदारी रचतील अशी आशा आहे.  -मुरली विजय