भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि U-19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने, भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. भारताची अनुभवी फलंदाजांची फळी यावेळी संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरेल असं द्रविडने ‘इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटलंय.

अवश्य वाचा – IPL 2018 – विराट कोहलीला कायम राखण्यावरुन रॉयल चँलेजर्स बंगळुरु संभ्रमात

“यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ हा तुल्यबळ आहे. या संघात अव्वल फिरकीपटू, जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू यांचा भरणा आहे. त्यामुळे या मालिकेत भारताला विजयाची समसमान संधी आहे. याचसोबत दक्षिण आफ्रिकेत जाण्याची ही आपली पहिली वेळ नाहीये, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, पुजारा, रोहित शर्मा यासारख्या फलंदाजांना आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे थोडी मेहनत घेतल्यास या मालिकेत भारताला नक्कीच सकारात्मक निकाल मिळू शकतात”, असं द्रविड म्हणाला.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याची सर्वोत्तम संधी – अजिंक्य

आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदाही मालिका जिंकलेली नाहीये. याआधी २०११ साली भारताने आफ्रिकेला १-१ अशा बरोबरीत रोखलं होतं. भारताची दक्षिण आफ्रिकेतली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जातेय. ५ जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत ३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. बुधवारी रात्री म्हणजेच २७ जुलै रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे.

अवश्य वाचा – आफ्रिकेत जिंकण्यासाठी जात आहोत! – प्रशिक्षक रवी शास्त्री