दक्षिण आफ्रिकेत १९ जानेवारीपासून १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ गेल्या महिन्यातच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी १२ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पंजाबचा उदय सहारन या स्पर्धेत भारतीय सघाचं नेतृत्व करणार आहे. नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतही त्यानेच भारतीय संघाची कमान सांभाळली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात महाराष्ट्राचे दोन आणि मुंबईच्या एका खेळाडूचा समावेश आहे. यामध्ये सोलापूरचा स्टार खेळाडू अर्शीन कुलकर्णीचाही समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मालिकेत अर्शीनने लक्षवेधी कामगिरी केली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या अर्शीनची आणि त्याचा आवडता खेळाडू जॅक कॅलिसची भेट झाली आहे. या भेटीमुळे अर्शीनला आभाळ ठेंगणं झालं आहे. कॅलिस हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. जगभरातल्या अव्वल दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये कॅलिसचं नाव आदराने घेतलं जातं. अर्शीन हादेखील एक अष्टपैलू खेळाडू आहे.

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची भेट झाल्यावर अर्शीन कुलकर्णी याने कॅलिसला एक पत्र दिलं. या पत्रात त्याने कॅलिसबाबतच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने कॅलिसला नमस्कार करून त्याचे आशीर्वादही घेतले. कॅलिसनेही अर्शीनला मिठी मारून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफही (स्वाक्षरी) दिला.

अर्शीनने त्याच्या आवडत्या खेळाडूला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम दिवस आहे. गेल्या १२ वर्षांपासून एक परिपूर्ण क्रिकेटपटू आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून मी तुमच्याकडे पाहत आलो आहे. आज तो दिवस आला आहे ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर मी तुम्हाला भेटू शकलो. माझे आई-बाबा जेव्हा मला विचारायचे की, तुझं आवडतं ठिकाण कोणतं? तेव्हा मी दक्षिण आफ्रिका असं उत्तर द्यायचो. मी एक दिवस तुम्हाला भेटू शकेन या आशेवर असं उत्तर द्यायचो. अखेर आज तो दिवस आला. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे आणि सर, तुम्ही नेहमीच माझे प्रेरणास्थान आहात.

हे ही वाचा >> Shikhar Dhawan: शिखर धवनने रोहित शर्माबाबत केले मोठे विधान; म्हणाला “त्याने माझं करिअर…”

१९ वर्षांखालील विश्वचषकासाठीचा भारतीय संघ

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India u 19 cricketer arshin kulkarni meet his idol jacques kallis take blessings asc