पोर्ट ऑफ स्पेनमधील भारतीय संघाच्या मालिका विजयापासून प्रेरणा घेत भारताच्या १९ वर्षांखालील संघानेही तिरंगी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. संपूर्ण स्पर्धेतील सातत्य अंतिम मुकाबल्यातही कायम राखत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत शानदार विजय मिळवला. २२ धावांत ३ बळी टिपणारा दीपक हुडा सामनावीर तर संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या विजय झोलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. चामा मिलिंदने मॅथ्यू शॉर्टला बाद करत सलामीची जोडी फोडली. त्यानंतर लगेचच त्याने बेन मॅकडरमॉटला माघारी धाडले. डेमियन मॉर्टिमर १० धावा करून दीपक हुडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. जेक डोरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र हुडाने त्याला श्रेयस अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतरच्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची अक्षरश: घसरगुंडी उडाली. अभिमन्यू लांबा, कुलदीप यादव, दीपक हुडा यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज निष्प्रभ ठरले आणि त्यांचा डाव ७५ धावांतच आटोपला. दीपक हुडाने १० षटकांत केवळ २२ धावा देत ३ बळी टिपले. अभिमन्यू लांबा, चामा मिलिंद, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियातर्फे मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक २५ धावा केल्या.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली. अखिल हेरवाडकर शून्यावरच बाद झाला. स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी करणारा कर्णधार विजय झोल ९ धावा काढून तंबूत परतला. मात्र त्यानंतर अंकुश बन्स आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५५ धावांची वेगवान भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बन्सने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४० तर सॅमसनने नाबाद २० धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा