माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची सूचना
साऊदम्पटन : पावसाचा फटका बसल्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत अनिर्णित राहिल्यास विजेता ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) योग्य सूत्र तयार करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लंडमधील वातावरणामुळे या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पूर्णत: वाया गेला. तसेच अंधूक प्रकाशामुळेही खेळात अनेकदा व्यत्यय आला. त्यामुळे राखीव सहावा दिवस उपलब्ध असतानाही हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.
‘‘सामना अनिर्णित अवस्थेत सुटल्यास कसोटी क्रिकेटमधील विश्वविजेता ठरवण्यासाठी निश्चित सूत्र हवे. ‘आयसीसी’च्या क्रिकेट समितीने याबाबत विचार करून योग्य निर्णय घ्यावा,’’ असा सल्ला गावस्कर यांनी दिला आहे.