पीटीआय, जकार्ता
भारताच्या वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी सोमवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतून भारताला पिस्तूल प्रकारात दोन ऑलिम्पिक कोटा मिळवून दिले. दोघांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची नोंद केली.या कामगिरीनंतर भारताच्या १५ नेमबाजांचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने १५ प्रवेश मिळवले होते. या वर्षी जुलै महिन्यात आणखी पात्रता फेरी शिल्लक असल्यामुळे भारत आणखी ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आशियाई पात्रता फेरीत पहिल्याच दिवशी भारताने सहा पदकांची कमाई केली. यामध्ये दोन सांघिक सुवर्णपदकांचाही समावेश आहे. वैयक्तिक प्रकारात २० वर्षीय वरुणने २३९.६ गुणांसह सोनेरी यश मिळविले. भारताचाच अर्जुन चीमा २७३.३ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. मंगोलियाच्या दवाखु एंखताईवानने कांस्यपदक मिळवले. त्यापूर्वी वरुण (५८६), चीमा (५७९), उज्वल मलिक (५७५) यांनी एकूण १७४० गुणांची कमाई करताना भारताला सांघिक सुवर्णपदक पटकावले. इराण, कोरिया रौप्य आणि कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
हेही वाचा >>>IND vs AFG: आकाश चोप्राने केले मोठे विधान; म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार…”
पाठोपाठ १९ वर्षीय इशाने २४३.१ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. पाकिस्तानची किशमला तलत रौप्य, तर भारताची रिदम सांगवान कांस्यपदकाची मानकरी ठरली. इशा, रिदम आणि सुरभी राव यांनी १७३६ गुणांची कमाई करताना सांघिक सुवर्णपदकाचीही कमाई केली.