‘इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)च्या निमित्ताने मी भारतात येईन’ असे त्याने ‘ट्विटर’वर जाहीर केले आणि त्याच्या भारतीय चाहत्यांनी व्हच्र्युअल जल्लोष केला. ‘‘भारताची संस्कृती समजून घेण्यासाठी फिरायचे आहे. कुठे जाऊ, काय पाहू? हे फोटोशॉपच्या माध्यमातून सांगा!’’ या रॉजर फेडररच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसादही अचंबित करणारा होता. डोंबाऱ्याच्या वेशातला फेडरर, होळी खेळणारा फेडरर, पवित्र गंगेत डुबकी मारणारा फेडरर, दिल्लीच्या प्रसिद्ध हिरव्या-पिवळ्या रिक्षातून मुसाफिरी करणारा फेडरर, राजेरजवाडय़ांप्रमाणे हत्तीवरून सफारी करणारा फेडरर, ऐतिहासिक ताजमहालसमोर उभा असणारा फेडरर अशी नानाविध फेडरररूपे चाहत्यांनी फोटोशॉपच्या करामतींसह ‘ट्विटर’वर सादर केली. हा अनुभव धमाल आणि अविश्वसनीय असल्याचे फेडररने दिल्ली भेटीत सांगितले.
नवी दिल्लीत दाखल झाल्यावर लीगचा संस्थापक महेश भूपतीसह छायाचित्र प्रसिद्ध होताच आता हा ‘टेनिसचा राजा’ नक्की खेळणार हा विश्वास चाहत्यांना मिळाला. इंदिरा गांधी मैदानावर फेडररला खेळताना कॅमेऱ्यात पकडून ते ‘ट्विटर’वर अपलोड करण्याची अहमहमिका पाहायला मिळाली. फेडररच्या दोन दिवसांच्या भारतभेटीत ‘ट्विटर फीड’ त्याच्या खेळतानाच्या छायाचित्रांनी भरला होता. केवळ दिखाऊ भेट न ठेवता संस्कृतीचा भाग असलेल्या भारतीय नान आवडल्याचे सांगून त्याचा फोटोही त्याने झटपट अपलोड केला. स्टेडियमवरच्या प्रत्येक आगमनाला, प्रत्येक सव्र्हिस आणि परतीच्या फटक्याला आवाजी पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचा निरोपही त्याने ‘ट्विटर’च्या माध्यमातूनच घेतला. ‘‘दिल्लीत घालवलेले अविस्मरणीय क्षण कायम स्मृतीत राहतील. नवी दिल्ली-मनापासून आभार! चाहत्यांचा विलक्षण आणि थक्क करणारा पाठिंबा. तुमचा ऋणी आहे!’’ अशा भावुक ‘ट्विट’सह फेडररने भारतीय चाहत्यांना अलविदा केले. ऑनलाइन व्यासपीठांवर चालणारे उपक्रम प्रत्यक्षात साकारतात का, याविषयी मंथन सुरू असते. मात्र आपल्या अद्भुत खेळाच्या जोरावर जगभरातल्या टेनिसचाहत्यांना दर्जेदार खेळाची पर्वणी देणाऱ्या रॉजर फेडररला ‘ट्विटर’च्या माध्यमातून मिळालेले प्रेम प्रत्यक्षातही तितकेच सच्चे असल्याची ग्वाही भारतीय चाहत्यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा