पीटीआय, मोहाली

वर्षभराहूनही अधिक कालावधीनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर आज, गुरुवारी मोहाली येथे होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सर्वाचे लक्ष असेल. तारांकित फलंदाज विराट कोहलीने मात्र वैयक्तिक कारणास्तव पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातून माघार घेतली आहे. परंतु तो उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल असे भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून त्यापूर्वी भारताची ही अखेरची ट्वेन्टी-२० मालिका असणार आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी संघबांधणीच्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धचे तीन सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड करताना या मालिकेसह भारतीय खेळाडूंची ‘आयपीएल’मधील कामगिरीही विचारात घेतली जाणार असल्याचे निवड समितीने स्पष्ट केल्याचे समजते.

हेही वाचा >>>IND vs AFG 1st T20 : विराट कोहली बाहेर झाल्याने कोणाचे नशीब उघडणार, प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा कोणाला देणार संधी?

रोहित आणि कोहलीचे आता ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाल्याने विश्वचषकासाठी त्यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. मात्र, त्यापूर्वी ट्वेन्टी-२० प्रारूपाशी पुन्हा जुळवून घेण्याची त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळणार आहे. भारतीय संघाला २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून रोहित आणि कोहली आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून दूर राहिले होते.

भारतीय संघाने गेल्या महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत झालेली ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. मात्र, त्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात सूर्यकुमारला दुखापत झाली. तर हार्दिक पंडय़ाही सध्या जायबंदी असल्याने निवड समितीने रोहित आणि कोहली यांना ट्वेन्टी-२० क्रिकेट पुन्हा खेळण्यासाठी तयार केले. आता हे दोघे या मालिकेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील.

दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघ आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याचे ध्येय बाळगून या मालिकेसाठी मैदानावर उतरेल. एकदिवसीय विश्वचषकातील शतकवीर इब्राहिम झादरान अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार असून त्यांची मदार मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फझलहक फारुकी या अनुभवी खेळाडूंवर असेल.

हेही वाचा >>>IND vs ENG : दिनेश कार्तिकला इंग्लंडच्या कोचिंग स्टाफमध्ये मिळाली महत्त्वाची जबाबदारी, ‘इतक्या’ दिवसांचा केला करार

कर्णधारावर आक्रमक सुरुवातीची जबाबदारी

अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला येणार असल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडने बुधवारी स्पष्ट केले. भारताला आक्रमक सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी रोहितवर असेल. एकदिवसीय विश्वचषकात रोहितने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर दडपण आणले होते. आता या कामगिरीची पुनरावृत्ती ट्वेन्टी-२० प्रारूपात करायला त्याला नक्कीच आवडेल. कोहली पहिल्या सामन्याला मुकणार असल्याने मधल्या षटकांत तिलक वर्माची भूमिका महत्त्वाची असेल. िरकू सिंह विजयवीराची भूमिका पार पाडेल. भारताच्या गोलंदाजीची मदार कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांच्यावर असेल.

रशीद खान मालिकेला मुकणार

अफगाणिस्तानचा नियमित कर्णधार आणि तारांकित फिरकीपटू रशीद खान भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत इब्राहिम झादरान अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल. रशीदच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडू आपला खेळ उंचावतील असा विश्वास झादरानने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला. एकदिवसीय विश्वचषकानंतर नोव्हेंबरमध्ये रशीदच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, रशीद अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेला नाही, असे झादरानने बुधवारी सांगितले.

वेळ : सायं. ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१, जिओ सिनेमा