बंगळुरूच्या छोट्या मैदानावर अफगाणिस्तानने भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत भारताविरुद्धचा सामना टाय केला. गुलबदीन नईब आणि मोहम्मद नबी यांनी सनसनाटी फटकेबाजी करत अनुभवी भारतीय संघाला नामोहरम केलं. २१३ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना रहमनुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झाद्रान जोडीने ९३ धावांची दमदार सलामी दिली. कुलदीप यादवने गुरबाझला बाद करत ही जोडी फोडली. गुरबाझने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरने झाद्रानला बाद केलं. त्याने ४१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची खेळी केली. पुढच्याच चेंडूवर ओमरझाइला शून्यावर बाद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुभवी मोहम्मद नबीने जोरदार प्रतिआक्रमण करत भारतीय गोलंदाजांना निरुत्तर केलं. त्याने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावांची वेगवान खेळी केली. वॉशिंग्टनने नबीला तंबूचा रस्ता दाखवत भारतीय संघाला पुनरागमनची संधी दिली. नबी बाद झाल्यावर अफगाणिस्तानची लय मंदावली पण गुलबदीन नईबने एका बाजूने ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा करत बरोबरी करुन दिली.

थरारक शेवटचं षटक

अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात ६ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती. मुकेश कुमारचा पहिला चेंडू वाईड गेला. पहिल्या चेंडूवर गुलबदीनने चौकार लगावला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. पुढचा चेंडू वाईड गेला. तिसऱ्या चेंडूवर २ धावा निघाल्या. चौथ्या चेंडूवर गुलबदीनने उत्तुंग षटकार लगावला. पाचव्या चेंडूवर गुलबदीनने दोन धावा केल्या. अफगाणिस्तानला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर गुलबदीनने दोन धावा करत सामना टाय केला.

पहिली सुपर ओव्हर टाय

मुकेश ओव्हरने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १६ धावा केल्या. पहिल्याच चेंडूवर गुलबदीन धावबाद झाला. त्यानंतर मोहम्मद नबी आणि रहमनुल्ला गुरबाझ यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि १६ धावा जमवल्या. १७ धावांचं लक्ष्य मिळालेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा-यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. पहिला चेंडू लेगबाय देण्यात आला. दुसऱ्या चेंडूवर जैस्वालने एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर रोहितने खणखणीत षटकार लगावला. चौथ्या चेंडूवर पुनरावृत्ती करत रोहितने आणखी एक षटकार खेचला. पाचव्या चेंडूवर रोहित रिटायर आऊट झाला. यशस्वी जैस्वालने एक धाव काढली होती. शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल एकच धाव काढू शकला आणि पहिली सुपर ओव्हर टाय झाली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजयी सुस्कारा!

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहितसह रिंकू सिंग खेळायला उतरले. फरीदच्या पहिल्या चेंडूवर रोहितने साईटस्क्रीनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला आणि सहा धावा वसूल केल्या. दुसऱ्या चेंडूवर थर्डमॅन क्षेत्रात चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर फरीदच्या ऑफस्टंपबाहेरचा चेंडू खेळण्याचा रिंकूचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टीरक्षकात्या दस्तानात जाऊन विसावला. पंचांनी नाबादचा निर्णय दिला होता. परंतु, अफगाणिस्तानने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी बादचा निर्णय दिला. पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. रोहितने धावायला सुरुवात केली आणि यष्टीरक्षक गुरबाझच्या अचूक फेकीने रोहित धावबाद झाला. दुसरा गडी बाद झाल्याने भारताचा डाव संपला. भारताने केवळ ११ धावा केल्या.

त्यानंतर भारतीय संघाने मैदान छोटं असूनही फिरकीपटू रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवर षटकार खेचायचा मोहम्मद नबीचा प्रयत्न रिंकू सिंगच्या हातात जाऊन विसावला. दुसऱ्या चेंडूवर करीम जनतने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर गुरबाझने नबीप्रमाणेच मारलेला फटका रिंकूच्याच हातात जाऊन विसावला. एका धावेवर अफगाणिस्तानने दोन गडी गमावले आणि भारताने विजयाचा सुस्कारा टाकला.

२२/४, २१२-२१२, १६-१६, १२-१

नाटयमय घडामोडींची रोलरकोस्टर राईड ठरलेल्या लढतीत भारत-अफगाणिस्तान तिसरा ट्वेन्टी-२० सामना आणि सुपर ओव्हर टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय फळला आणि भारताने विजय साकारला. रोहित शर्माच्या शतकी खेळीला गुलबदीन नईब-मोहम्मद नबी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs afghanistan 3rd t20i 2024 into super over after match tie asc