बंगळूरु : पहिल्या दोन सामन्यांत खातेही न उघडता माघारी परतणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा कामगिरी उंचावण्यासाठी उत्सुक असून आज, बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याचा आक्रमक खेळीचा प्रयत्न असेल. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना आहे. बंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार असून फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Shikhar Dhawan: शिखर धवनने रोहित शर्माबाबत केले मोठे विधान; म्हणाला “त्याने माझं करिअर…”

भारतीय संघाने मोहाली आणि इंदूर येथे झालेल्या पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत सहज विजय नोंदवले. हे दोन्ही सामने भारताने सहा गडी राखूनच जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर भारतीय संघांना युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या योजनेत बदल करत या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित आणि कोहली या अनुभवी फलंदाजांना पुन्हा क्रिकेटच्या या लघुत्तम प्रारूपात खेळण्यासाठी गळ घातली. अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या दोनही सामन्यांत रोहित शून्यावरच माघारी परतला. कोहली वैयक्तिक कारणास्तव पहिल्या सामन्याला मुकला. दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करताना त्याने १६ चेंडूंत २९ धावा फटकावल्या. मात्र, आक्रमक फलंदाजी करतानाच त्याचा अधिक मोठी खेळी करण्याचाही प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> T20 World Cup: पार्थिव पटेलचा मोठा दावा; म्हणाला, “जितेश शर्माचे टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणे…”

पहिल्या दोनही सामन्यांत अष्टपैलू शिवम दुबेने अर्धशतके साकारताना ट्वेन्टी-२० विश्वचषकाकरिता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसऱ्या सामन्यात दुबेला यशस्वी जैस्वालची मोलाची साथ लाभली. कर्णधार रोहितने मात्र दोनही सामन्यांत निराशा केली. रोहितला गेल्या १५ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० डावांत केवळ दोन वेळा अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे त्याच्यावर धावा करण्यासाठी निश्चितच दडपण असेल.

* वेळ : सायं. ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs afghanistan 3rd t20i match prediction zws