पुढील महिन्यामध्ये ऑस्ट्रेलिया सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून ज्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिलं जात आहे ती आजपासून सुरु होणार आहे. मोहालीच्या मैदानावर आज अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील भारतात दाखल झालेला ऑस्ट्रेलियाचा पाहुणा संघ भारतीय संघाविरोधात मैदानात उतरणार आहे. आशिया चषक स्पर्धेमधून अगदीच अनपेक्षितरित्या बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार असून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचंही या मालिकेकडे विशेष लक्ष असणार आहे. मात्र आजपासून सुरु होणारी ही मालिका नेमकी कुठे पाहता येणार आहे? सामने किती वाजता सुरु होणार? कुठे खेळवले जाणार यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. त्यावरच टाकलेली नजर…
नक्की वाचा >> India vs Australia: …तर आजच्या सामन्यात केवळ दोन चेंडूंमध्ये रोहित शर्माच्या नावावर होईल अनोखा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेला महिन्याभराचा कालावधीही उरलेला नाही. त्यामुळेच ही मालिका फार महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्येही भारताचे सर्व प्रमुख खेळाडू संघात असतील. भारतीय संघ व्यवस्थापनाने केवळ काही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील कामगिरीबरोबरच आगामी मालिकेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने महत्त्वाचे आहेत. भारतीय संघाला मधल्या फळीत प्रयोग करण्याबरोबरच विश्वचषकाआधी मधल्या फळीचं गणित योग्य पद्धतीने जुळवण्याचं आव्हान या पुढील दोन मलिकांमध्ये असणार आहे.
भारतीय मैदानांवर ऑस्ट्रेलियन संघ कसा खेळतो हे पाहणं रंकज असणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघातील वेगवान गोलंदाज विरुद्ध भारतीय सलामीवीर असा सामना पहायला मिळणार आहे.
भारतीय संघ असा आहे –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, दीपक चहर, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.
ऑस्ट्रेलियन संघ असा आहे –
अॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शॉन अॅबट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, डॅनियल सॅम्स, अॅश्टन एगर, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, नेथन एलिस.
कुठे खेळवला जाणार सामना?
आजचा सामना पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कधी सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे. सात वाजता नाणेफेक होईल आणि साडेसातला प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.
आजचा सामना कुठे पहायला मिळणार?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. आजचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल.
ऑनलाइन किंवा अॅपवर कुठे पाहता येणार सामना?
डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल. तसेच सामान सुरु झाल्यानंतर येथे क्लिक करुन या सामन्यासंदर्भातील सर्व बातम्या आणि स्कोअरकार्ड तुम्हाला पाहता येईल.
पुढील सामने कधी?
तीन सामन्यांच्या या मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील अंतिम सामना हा रविवारी २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल.