कर्णधारपदाचे पदार्पण शतकासह झोकात साजरा करणारा विराट कोहली हा भारताचा तिसरा कसोटीपटू ठरला आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या आभाळाएवढय़ा धावसंख्येला भारताने तितक्याच ताकदीने प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताच्या खात्यावर समाधानकारक ५ बाद ३६९ धावा जमा होत्या.
महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीने पदार्पणात शतक झळकावून विजय हजारे आणि सुनील गावस्कर या भारतीयांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. कोहलीने १८४ चेंडूंत १२ चौकारांसह आपली दिमाखदार खेळी केली. आपल्या खेळीत त्याने तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. तिसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ८१ धावांची, चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसोबत १०१ धावांची आणि पाचव्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत ७४ धावांची भागीदारी केली.
२६ वर्षीय कोहलीने गुरुवारी भारतीय फलंदाजीची आघाडी समर्थपणे सांभाळताना सातवे शतक साकारले. दिवसाच्या अखेरच्या सत्रात ९५व्या षटकात मिचेल जॉन्सनचा आखूड टप्प्याचा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात ११५ धावांवर त्याची खेळी आटोपली. डीप फाइन लेगला रयान हॅरिसने त्याचा झेल टिपला. खेळ थांबला तेव्हा भारताचा किल्ला लढवणारा रोहित शर्मा ३३ आणि वृद्धिमान साहा १ धावांवर खेळत होते.
सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेरच्या ७ बाद ५१७ धावसंख्येवरच पहिला डाव घोषित केला. पावसामुळे बुधवारी चार तासांचा खेळ वाया गेला होता. त्यामुळे गुरुवारी खेळाला लवकर सुरुवात करण्यात आली. निरभ्र सूर्यप्रकाशात कोहलीची फलंदाजी आणि भारताची धावसंख्या निर्धाराने वाटचाल करीत होती, परंतु तो बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला आहे.
डावाच्या सुरुवातीला आठव्याच षटकात सलामीवीर शिखर धवन (२५) तंबूत परतला, परंतु भारताच्या आघाडीच्या फळीने मात्र संयमी खेळ करीत साडेतीनशेच्या पलीकडे मजल मारली.
पहिल्या सत्रात मुरली विजयने (५३) आपले सातवे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. मग दुसऱ्या सत्रात पुजाराने (७३) सहावे अर्धशतक नोंदवले, त्यानंतर तिसऱ्या सत्रात कोहलीने प्रेरणादायी शतकी खेळी उभारली. याच सत्रात रहाणेनेही (६२) आपले पाचवे कसोटी अर्धशतक साकारले.
वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला बळी मिळवण्यासाठी झगडावे लागले. त्याच्या १८ षटकांत भारतीय फलंदाजांनी ९० धावा काढल्या. कोहलीचा अडसर दूर करण्यात मात्र जॉन्सनची भूमिका महत्त्वाची होती. फिरकीपटू नॅथन लिऑननेही दोन बळी मिळवण्यात यश मिळवले, परंतु त्यासाठी ३० षटकांत त्याने १०३ धावा दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा