भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडलेड कसोटीच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी भारतीय संघाचा डाव ४४४ धावांत आटोपला. कालच्या पाच बाद ३६९ धावसंख्येवरून डावाची सुरूवात केल्यानंतर भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.  
रोहित शर्मा ८९ चेंडूंत ४३ धावा करुन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर कर्ण शर्मा केवळ ४ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर साहाने शमीच्या साथीने भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण साहा २५ धावांवर तर ईशांत शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. मग शमीने आक्रमक फलंदाजी करत भारताला ४४४ धावांची मजल मारुन दिली. शमीने २४ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावांची खेळी केली.
त्यानंतर, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात सलामवीर क्रिस रॉजर्स लवकर माघारी परतल्यामुळे मोठा धक्का बसला होता. मात्र, पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या डावातही आक्रमक शतक झळकावत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. कर्णधार मायकेल क्लार्क आणि शेन वॉटसनला स्वस्तात बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. स्मिथ देखील चांगल्या फॉर्मात असून त्यानेही आपले अर्धशतक गाठले आहे. चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे ३६३  धावांची भक्कम आघाडी असून ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज बाद झाले आहेत.

Story img Loader