भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या उत्तुंग फटकेबाजीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं अॅडम झम्पा गोलंदाजीवर षटकारांची हॅटट्रिक केली होती. त्याची अफलातून खेळी पाहणाऱ्याला तो आगामी काळात युवराज सिंगचा विक्रम सहज मोडेल, असा विश्वास निर्माण झालाय. क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या पांड्याच्या कामगिरीनं त्याचे वडील आनंदीत झाले आहेत. हार्दिकच्या बॅटमधून लवकरच एका षटकात ६ षटकार पाहायला मिळतील, असे स्वप्न त्याचे वडील हिमांशू पांड्या पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पांड्याला बढती देण्यात आली होती. या सामन्यातही त्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते.

हिमांशू पांड्या यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये  हार्दिकच्या धमाकेदार कामिगिरीचं कौतुक केलं. ते म्हणाले, हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलग तीन षटकार खेचण्याचा पराक्रम केला. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा अशी कामगिरी केली. आम्ही आता त्याचे एका षटकात ६ षटकार पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तो दिवस फार दूर नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पांड्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील २८ डावात ४० षटकार खेचले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या मालिकेतील तीन सामन्यात पांड्यानं १८१ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मालिकेतील सर्वाधिक धावासोबतच सर्वाधिक स्टाईक रेटनं धावा करण्यातही पांड्या अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने ११०.३६ च्या स्टाईक रेटनं धावा केल्या आहेत. यात ९ षटकारांचा समावेश आहे. अर्थातच पांड्याने प्रत्येक सामन्यात सरासरी तीन षटकार अशी कामगिरी केली आहे. फलंदाजीशिवाय गोलंदाजीमध्येही तो आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलाय. पांड्यानं आतापर्यंत या मालिकेत पाच बळी टिपले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीनं ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला मनिष पांडेऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्यानं पुन्हा बहारदार खेळी करत मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावल होतं.

Story img Loader