विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला नवा कसोटी कर्णधार मिळाल्यानंतर त्याच्या कामगिरीविषयी सर्वानाच उत्सुकता निर्माण झाली होती. पण मालिकेतील चौथे शतक झळकावत कोहलीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोहली आणि पहिलेवहिले शतक झळकावणारा लोकेश राहुल यांच्या दमदार खेळीने भारताचा पहिला डाव सावरला आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३४२ अशी मजल मारली असली तरी फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला अद्याप ३१ धावांची गरज आहे.
कोहलीने कारकीर्दीतील दहावे शतक झळकावताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. सिडनी क्रिकेट मैदानावरील फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कोहलीने राहुलसह तिसऱ्या विकेटसाठी केलेली १४१ धावांची भागीदारी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. कर्णधार म्हणून कसोटी सामन्याच्या पहिल्या तीन डावांत शतक झळकावणारा कोहली एकमेव कर्णधार ठरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक धावांचा राहुल द्रविडचा (६३९ धावा) विक्रम कोहलीने गुरुवारी मागे टाकला. कोहलीच्या नावावर आता ६३९ धावा जमा आहेत. कोहलीला ५९ धावांवर असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने दुसऱ्या स्लिपमध्ये जीवदान दिले. या जीवदानाचा फायदा उठवत कोहलीने मालिकेतील चौथे शतक साकारले. २१४ चेंडूंत २० चौकारांसह तो १४० धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियात एका मालिकेत चार शतके झळकावणारा कोहली हा हर्बर्ट सटक्लिफ (१९२४-२५) आणि वॉल्टर हॅमाँड (१९२८-२९) यांच्यानंतरचा पहिला फलंदाज ठरला.
कारकीर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या लोकेश राहुलने शतक साजरे करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ४६ धावांवर स्मिथने दिलेल्या जीवदानाचा फायदा उठवत राहुलने शानदार खेळी साकारली. कोहली आणि राहुल यांनी सुरेख फलंदाजी करत भारताला भक्कम स्थितीत आणले. मात्र मिचेल स्टार्कने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. राहुलने १३ चौकार आणि एक षटकारासह ११० धावा फटकावल्या.
अजिंक्य रहाणेने कोहलीसह चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भर टाकली. पण चाचपडणाऱ्या रहाणेला शेन वॉटसनने पायचीत पकडले. बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणाऱ्या सुरेश रैनाकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा भारताला होती. पण पहिल्याच चेंडूवर फटकेबाजी करण्याचा मोह त्याला महागात पडला. वॉटसनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने त्याचा झेल टिपला. वॉटसनची  हॅट्ट्रिक वृद्धिमान साहाने पूर्ण होऊ दिली नाही. आता शुक्रवारी जास्तीतजास्त धावा काढून सामना अनिर्णीत राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

धावफलक
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव- ७ बाद ५७२ (डाव घोषित)
भारत : पहिला डाव- मुरली विजय झे. हॅडिन गो. स्टार्क ०, लोकेश राहुल झे. आणि गो. स्टार्क ११०, रोहित शर्मा त्रि. गो. लिऑन ५३, विराट कोहली खेळत आहे १४०, अजिंक्य रहाणे पायचीत गो. वॉटसन १३, सुरेश रैना झे. हॅडिन गो. वॉटसन ०, वृद्धिमान साहा खेळत आहे १४, अवांतर- १२ (बाइज-१, लेगबाइज-६, वाइड-१, नोबॉल-४), एकूण : ११५ षटकांत ५ बाद ३४२.
बाद क्रम : १-०, २-९७, ३-२३८, ४-२९२, ५-२९२
गोलंदाजी : मिचेल स्टार्क २१-४-७७-२, रयान हॅरिस २३-६-६३-०, जोश हेझलवूड २०-५-४५-०, नॅथन लिऑन ३२-७-९१-१, शेन वॉटसन १५-४-४२-२, स्टिव्हन स्मिथ ४-०-१७-०.

Story img Loader