Shubman Gill Viral Video : संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अहमदाबाद कसोटी सामन्याची अखेर सांगता झाली. बॉर्डर गावसरकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने २-१ ने आघाडी घेत कसोटी मालिकेवर विजय संपादन केलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४८० धावा केल्या होत्या. अमहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं. कारण टीम इंडियाचे फलंदाजांनीही कांगारुंना तोडीस तोड उत्तर दिलं. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने पहिल्या डावात शतकी खेळी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. शुबमनने २३५ चेंडूत १२८ धावांची शतकी खेळी केली. गिलने या इनिंगमध्ये १२ चौकार आणि १ षटकार ठोकला. गिलने कसोटी कारकिर्दीतील दुसरं शतकं केलं. तसंच भारतील त्याचं हे पहिलंच शतक आहे. पण शतक ठोकल्यानंतर शुबमने दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराशी संवाद साधला.
पुजाराशी संवाद साधताना शुबमन म्हणाला की, मागील तीन कसोटी सामन्यांपेक्षा या सामन्यात फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी होती. या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली. पु्न्हा अशाप्रकारची खेळपट्टीवर खेळायला कधी मिळेल, याबाबत मला माहित नाही. कोणत्याही प्रकारचा खराब फटका मारून मला खेळण्याची संधी गमवायची नाहीय. नेहमी चांगलं खेळलं पाहिजे, असाच विचार मी करतो. भारतात कसोटी सामन्यात शतक ठोकल्यानंतर खूप आनंद होतो. भारतातील माझं हे पहिलं शतक आहे आणि आयपीएलच्या होम ग्राऊंडवर शतकी खेळी केल्यामुळं मला खूप जास्त आनंद झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून अप्रतिम फॉर्मात आहे. त्याने कसोटीत दोन शतक ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतक आणि एक द्विशतक करण्याची चमकदार कामगिरी गिलने केली आहे. तसंच टी-२० क्रिकेटमध्येही गिलने शतकी खेळी केली आहे. शुबमन गिल पुजाराशी बोलताना पुढे म्हणाला, “फिरकीपटूंसमोर मी सावध खेळी करत होतो. पण वेगवान गोलंदाजांसमोर तुम्ही त्याच शैलीत खेळू शकत नाही. तुम्हाला दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांसोबत खेळायचं असल्यास फलंदाजीचा समतोल ठेवावा लागतो. मी फलंदाजी करण्याबाबत सकारात्मक राहण्याच प्रयत्न करतो. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न करतानाच एखाद्या खराब चेंडूची वाट पाहायची.”