अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिलेली उत्कंठा आणि थरार, आशा-निराशेचे हिंदोळे, धावांची बरसात.. अशा वातावरणात व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवला. भारताने सहा विकेट राखून सहावी एकदिवसीय लढत जिंकली आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
ऑस्ट्रेलियाचे ३५१ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी भारताने आत्मविश्वासाने डाव सुरू केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने सुरुवातीलाच घेतलेल्या आक्रमक पवित्र्यासह भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्माच्या तीन षटकारांनी तर सामन्याचा नूरच पालटला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १७८ धावांच्या भागीदारीमुळे भारताची स्थिती अतिशय मजबूत झाली. त्यानंतर धवन आणि कोहली या जोडीनेही हीच आक्रमकता जोपासली. शिखर धवनने १०० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
विराट कोहलीने निश्चय केल्याप्रमाणेच फलंदाजी केली. त्याने ६६ चेंडूंमध्ये १८ चौकार व एका षटकारासह नाबाद ११५ धावा फटकावल्या. त्याने रैनासह केलेली ५६ धावांची भागीदारीही महत्त्वपूर्ण ठरली. सामन्याच्या ४०व्या षटकानंतर खेळ काहीसा संथ होऊन एक-दोन धावांची भर पडू लागली, तेव्हा अनिश्चितता निर्माण झाली. १८ चेंडूंमध्ये ३५ धावा, १२ चेंडूंत २०, ६ चेंडूत ६ आणि अखेर ४ चेंडूंमध्ये २ धावा अशा अतिशय तणावपूर्ण स्थितीचा सामना केल्यानंतर चौकार किंवा षटकाराने सामना संपवण्याची वाट न पाहता धोनीने दोन धावा काढून लक्ष्य पूर्ण केले आणि तीन चेंडू शिल्लक असताना भारताने हा सामना खिशात घातला.
बुधवारी दिवसभरात तब्बल ७०१ धावा झाल्याने हा ‘फलंदाजांचा दिवस’ ठरला. नाबाद ११५ धावा काढून सामना भारताच्या बाजुने झुकवणाऱ्या विराट कोहलीला ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, पण हा निर्णय भारताच्या अंगाशी आला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा भरपूर समाचार घेत भारतासमोर विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले. १७व्या षटकात एक नाटय़ घडले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर वॉटसनचा उंच उडालेला झेल रोहित शर्माने घेतला आणि भारतीय संघाच्या चाहत्यांचा उत्साह दुणावला. पण तिसऱ्या पंचांनी हा चेंडू ‘नो-बॉल’ असल्याचे जाहीर केल्याने वॉटसनला जीवदान मिळाले. त्यानंतर वॉटसनने या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला. ऑस्ट्रेलियन संघ २२ षटकांमध्ये फक्त ८९ धावा करू शकला होता. मात्र त्यानंतर बेलीने अश्विनच्या गोलंदाजीवर एक षटकार व एक चौकार खेचून सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने वॉटसनसह तिसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी केली. या दोघांनी चौकार आणि षटकारांची बरसात केली. ३५व्या शतकात वॉटसनने सलग तीन चेंडूंवर चौकार लगावून शतक पूर्ण केले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. यानंतर बेलीने अ‍ॅडम व्होग्जच्या साथीने पाचव्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बेलीने ११४ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांसह १५६ धावा झळकावल्या. वॉटसनने कारकीर्दीतील नववे, तर बेलीने दुसरे शतक पूर्ण केले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया : फिलिप ह्य़ुजेस झे. कोहली गो. भुवनेश्वर कुमार १३, आरोन फिन्च त्रि. गो. अश्विन २०, शेन वॉटसन त्रि. गो. शामी १०२, जॉर्ज बेली झे. कोहली गो. जडेजा १५६, ग्लेन मॅक्सवेल झे. भुवनेश्वर गो. अश्विन ९, मिचेल जॉन्सन झे. धवन गो. जडेजा ०, अ‍ॅडम व्होग्ज नाबाद ४४, ब्रॅड हॅडिन नाबाद ०, अवांतर-६ (वाइड-३, नोबॉल-३), एकूण : ६ बाद ३५०धावा.
बाद क्रम : १-३०, २-४५, ३-२१३, ४-२२४, ५-३४४, ६-३४६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-०-४२-१, मोहम्मद शामी ८-१-६६-१, रवींद्र जडेजा १०-०-६८-२, आर. अश्विन १०-०-६४-२, अमित मिश्रा १०-०-७८-०, विराट कोहली २-०-१५-०, सुरेश रैना २-०-१७-०.
भारत : रोहित शर्मा झे. फॉल्कनर गो. फिन्च ७९, शिखर धवन त्रि. गो. फॉल्कनर १००, विराट कोहली नाबाद ११५, सुरेश रैना झे. हॅडिन गो. जॉन्सन १६, युवराज सिंग त्रि. गो. जॉन्सन ०, महेंद्रसिंग धोनी नाबाद २५, अवांतर-१६ (लेगबाइज-८, वाइड-७, नोबॉल-१), एकूण : ४९.३ षटकांत ४ बाद ३५१.
बाद क्रम : १-१७८, २-२३४, ३-२९०, ४-२९०.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन १०-०-७२-२, क्लिंट मकाय ७-०-४७-०, जेम्स फॉल्कनर ९.३-०-७३-१, झेव्हियर डोहर्टी ६-०-४०-०, शेन वॉटसन ६-०-५१-०, ग्लेन मॅक्सवेल ७-०-४०-०, आरोन फिन्च ४-०-२०-१.
सामनावीर : विराट कोहली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा