पीटीआय, बंगळूरु
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी मिळवली असली, तरी आपले वर्चस्व कायम राखताना आज, रविवारी होणारा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज दीपक चहर यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असून १० डिसेंबरपासून ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत श्रेयस आणि चहर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करून लय मिळवण्याचा या दोघांचा मानस असेल.
श्रेयसने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. चिन्नास्वामीवर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शतकही झळकावले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती करायला श्रेयसला नक्कीच आवडेल. मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून त्याला धावांसाठी झगडावे लागले आहे. गेल्या १४ ट्वेन्टी-२० डावांमध्ये त्याला केवळ एक अर्धशतक करता आले आहे. तसेच क्रिकेटच्या या लघुत्तम प्रारूपात तो सातत्याने सामने खेळलेला नाही. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा सामना हा त्याचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील १३ महिन्यांतील पहिला सामना होता. त्याला सात चेंडूंत आठ धावाच करता आल्या. तो कामगिरी उंचावण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल.
हेही वाचा >>>MS Dhoni : माहीने आपल्या मित्राचा वाढदिवस केला साजरा, एकमेकांना केक भरवतानाचा VIDEO व्हायरल
चिन्नास्वामीच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित आहे. अशात गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. विशेषत: दीपक चहर कशी गोलंदाजी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ३१ वर्षीय चहरला गेल्या काही वर्षांपासून दुखापतींनी सतावले आहे. त्यामुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले आहे. चहरने यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याचे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात चहरने ४४ धावा खर्ची केल्या, पण खेळपट्टीवर टिकून असलेल्या टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्ट यांचा अडसर दूर केला. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यात मदत झाली. आता तो कामगिरीत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
वॉशिंग्टन सुंदरला संधी?
भारतीय संघाने या मालिकेच्या चार सामन्यांत मिळून एकूण १५ खेळाडूंना संधी दिली आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला मात्र संधीसाठी वाट पाहावी लागते आहे. आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी सुंदरला खेळवण्याचा पर्याय भारताकडे आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अक्षरला भारतीय संघात स्थान मिळालेले नसून सुंदरचा या संघात समावेश आहे. त्यामुळे या दौऱ्यापूर्वी सुंदरला सामना खेळण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. भारताच्या फलंदाजीची धुरा कर्णधार सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, िरकू सिंह यांच्यावरच असेल. गोलंदाजीत लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि मुकेश कुमार यांची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरू शकेल.
विजयी सांगतेसाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक
ऑस्ट्रेलियन संघ गेल्या दोन महिन्यांपासून भारतात असून या काळात त्यांनी एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपदही पटकावले आहे. मात्र, ट्वेन्टी-२० मालिकेत त्यांना आपली सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. असे असले तरी आता भारत दौऱ्याची विजयी सांगता करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाची मदार ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मॅथ्यू वेड यांच्यावर असेल. तसेच टीम डेव्हिड, बेन मॅकडरमट आणि मॅट शॉर्ट या फलंदाजांमध्येही फटकेबाजीची क्षमता आहे. गोलंदाजीत जेसन बेहरनडॉर्फने चमक दाखवली आहे. तन्वीर संघा, बेन ड्वारशस यांसारख्या गोलंदाजांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.