India vs Australia, Cricket World Cup 2023 Final Highlights : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकून विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत भारताने सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.

Live Updates

World Cup 2023 Final India vs Australia Highlights Match Updates : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

21:25 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक, भारताचा ६ गडी राखून उडवला धुव्वा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यादा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकवले.

21:11 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाची विजयाच्या दिशेने वाटचाल

३९ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावा आहे. कांगारूंना आता विजयासाठी ६६ चेंडूत केवळ २२ धावा करायच्या आहेत. ट्रॅव्हिस हेड १२७ आणि मार्नस लाबुशेन ४८ धावांवर खेळत आहेत.

20:53 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ट्रॅव्हिस हेडने झळकवले विश्वचषकातील दुसरे शतक! भारताच्या वाढल्या अडचणी

ट्रॅव्हिस हेडने ९५ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने शतक झळकावले. ३४ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा आहे. तर मार्नस लाबुशेन ८२ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये १३८ धावांची भागीदारी झाली आहे.

20:32 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी निर्माण केली होती संधी

जसप्रीत बुमराहने येताच टीम इंडियासाठी विकेट्सची संधी निर्माण केली. मार्नस लाबुशेनविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले होते, पण मैदानी पंचांनी ते नाकारले. कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला, चेंडू स्टम्पवर आदळत होता, पण अंपायरच्या कॉलमुळे टीमला विकेट मिळवता आली नाही.

20:27 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ट्रॅव्हिस हेड भारत आणि ट्रॉफीच्यामध्ये बनला भिंत

ट्रॅव्हिस हेड भारत आणि ट्रॉफीच्यामध्ये भिंत बनला आहे. भारतीय गोलंदाज हेडच्या विकेटसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २७.४ षटकानंतर ८४ धावांची गरज आहे. ट्रॅव्हिस हेड ८० आणि मार्नस लाबुशेन ३४ धावांवर खेळत आहे.

20:08 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final:ऑस्ट्रेलियाने शतक, तर ट्रॅव्हिस हेडने झळकावले अर्धशतक

ट्रॅव्हिस हेडने अर्धशतक ठोकले आहे. टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकताना दिसत आहे. ट्रॅव्हिस हेडने ५८ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. लाबुशेनने ४५ चेंडूत एका चौकारासह २२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

19:55 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: हेड आणि लाबुशेनने सावरला संघाचा डाव, ऑस्ट्रेलियाने १०० धावांचा टप्पा केला पार

ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी मिळून ऑस्ट्रेलियन डावाची धुरा सांभाळली आहे. दोघेही सावधपणे खेळत असून विकेट पडणे थांबवले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने १०० धावांचा टप्पा पार केला आहे. २० षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १०४/३ आहे. ट्रेव्हिस हेड ४४ आणि मार्नस लाबुशेन १७ धावांवर खेळत आहेत.

19:44 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: हेड आणि लाबुशेनने सांभाळली ऑस्ट्रेलियाच्या डावाची धुरा

ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी मिळून ऑस्ट्रेलियन डावाची धुरा सांभाळली आहे. दोघेही सावधपणे खेळत असून विकेट पडणे थांबवले आहे. दोघांनी मिळून सात षटके खेळली आहेत आणि हळूहळू ऑस्ट्रेलियाला लक्ष्याच्या दिशेने नेत आहेत. मात्र, या भागीदारीतील धावगती खूपच कमी आहे. १८ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९५/३ आहे. ट्रेव्हिस हेड ४१ आणि मार्नस लाबुशेन ११ धावांवर खेळत आहे.

19:32 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: १६ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ८७ धावा

ऑस्ट्रेलिया संघाने १६ षटकानंतर ३ बाद ८७ धावा केल्या आहेत. ट्रेव्हिस हेड ३५ आणि मार्नस लाबुशेन ९ धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत भारताकडून मोहम्मद शमीने एक आणि जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या आहेत.

19:23 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ११ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ६५ धावा

११ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा आहे. शमी आणि बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल दिसत आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांचा उत्साह वाढत आहे. ट्रेव्हिस हेड २१ आणि मार्नस लाबुशेन १ धावा काढून नाबाद आहे. सामन्यादरम्यान विराट आणि लाबुशेन एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

19:12 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्या, पण स्टीव्ह स्मिथ होता ‘नॉट आऊट’

ऑस्ट्रेलियाच्या एकूण ४७ धावांवर तीन विकेट पडल्या आहेत. जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. मात्र, स्मिथ नॉट आऊट’ होता. त्याने डीआरएस घेतला असता, तर तो नाबाद राहिला असता. पण स्मिथने रिव्ह्यू घेतला नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी शानदार गोलंदाजी करत आहेत.

19:08 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: जसप्रीत बुमराहची कमाल! मार्श पाठोपाठ स्मिथलाही दाखवला तंबूचा रस्ता

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला उद्ध्वस्त केले आहे. त्याने स्टीव्ह स्मिथला एलबीडब्ल्यू केले आहे. कांगारू संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे.

18:52 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: शमी पाठोपाठ बुमराहने दिल ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, मिचेल मार्श १५ धावा काढून बाद

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मिचेल मार्श खूपच आक्रमक दिसत होता. पण बुमराहने त्याच्या खेळीला ब्रेक लावला आहे. ५० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे.

18:44 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: दोन षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद २८ धावा

पॉवरप्लेचा चांगला वापर करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज मैदानात उतरले आहेत. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड दोघेही फलंदाजी करत आहेत. २ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद २८ धावा आहे.

18:36 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलिया दिला धक्का! डेव्हिड वार्नर ७ धावा करुन बाद

मोहम्मद शमीने येताच पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला विराट कोहलीच्या हाती झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला हा मोठा धक्का बसला. डेव्हिड वार्नर ७ धावा करुन तंबूत परतला.

18:31 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाने पहिल्याच चेंडूवर गमावली विकेटची संधी, डेव्हिड वार्नरने लगावला चौकार

टीम इंडियाने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची संधी गमावली. विराट कोहलीने डेव्हिड वार्नरचा झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही.

18:23 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: पहिला डाव संपल्यानंतर रंगला समापन समारोह

सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर समापन समारोह रंगला. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी, नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी हे देखील परफॉर्म केले.

17:59 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले २४१ धावांचे लक्ष्य, विराट-राहुलने झळकावले अर्धशतक

टीम इंडियाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर २४० धावा केल्या आहेत. भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

भारताने पहिल्या १० षटकांत ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक नियोजनासह शानदार गोलंदाजी केली

17:47 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाला बसला नववा धक्का! जोश हेझलवूडने सूर्यकुमार यादवला केले बाद

सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अडचणीत आला आहे. टीम इंडियाला २२६ धावसंख्येवर नववा झका बसला आहे.

17:35 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: मिचेल स्टार्क पाठोपाठ झाम्पाने टीम इंडियाला दिला आठवा झटका! बुमराह एक धाव काढून बाद

टीम इंडियाचा आठवा फलंदाज जसप्रीत बुमराहही बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अॅडम झाम्पानेही पहिले यश मिळवले आहे. भारताने ४६ षटकात आठ विकेट गमावत २२१ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव १५ धावांवर तर कुलदीप यादव पाच धावांवर नाबाद आहे.

17:27 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: रवींद्र जडेजा पाठोपाठ मोहम्मद शमीही बाद, मिचेल स्टार्कने घेतली तिसरी विकेट

मिचेल स्टार्कने टीम इंडियाला सातवा धक्का दिला आहे. मोहम्मद शमी ६ धावांवर झेलबाद झाला. मिचेल स्टार्कची ही तिसरी विकेट आहे. टीम इंडियाने ४४ षटकानंतर ७ बाद २१२ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव १३ आणि जसप्रीत बुमराह १ धाव काढून खेळत आहे.

17:15 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: मिचेल स्टार्कने टीम इंडियाला दिला सहावा झटका! केएल राहुल ६६ धावांवर बाद

मिचेल स्टार्कने टीम इंडियाला दिला सहावा झटका दिला आहे. केएल राहुल ६६ धावांवर झेलबाद झाला. ४२ षटकानंतर टीम इंडियाने ६ गडी गमावून २०७ धावा केल्या आहेत.

17:08 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाने ५ गडी गमावून ओलांडला २०० धावांचा टप्पा

भारतीय संघाने ४१ षटकानंतर ५ बाद २०० धावा केल्या आहेत. केएल राहुल १०६ चेंडूत ६६ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव १४ चेंडूत ९ धाव काढू नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आहेत.

16:58 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: ३८ षटकानंतर भारताची धावसंख्या ५ बाद १८२ धावा

केवळ १७८ धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्यानंतर भारतीय संघाने ३८ षटकानंतर ५ बाद १८२ धावा केल्या आहेत. केएल राहुल ९६ चेंडूत ५८ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव ६ चेंडूत १ धाव काढू नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आहेत.

16:47 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाचा निम्मा संघ परतला तंबूत

जोश हेझलवुडने टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. त्याने रवींद्र जडेजाला यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद केले. जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. टीम इंडियाची धावसंख्या ५ बाद १७८ धावा आहे.

16:39 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: केएल राहुलने झळकावले विश्वचषकातील दुसरे अर्धशतक

केएल राहुलने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने ८६ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा २० चेंडूत ९ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर ३५ षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ बाद १७४ धावा आहे.

16:35 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: केएल राहुल अर्धशतकाच्या जवळ

३४ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा आहे. केएल राहुल एका चौकाराच्या मदतीने ८४ चेंडूत ४८ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा १६ चेंडूत ७ धावांवर खेळत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये ३३ चेंडूत २१ धावांची भागीदारी झाली आहे.

16:23 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: केएल राहुल आणि रवींद्र जडेजाकडून सावध फलंदाजी

विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या जागी रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. टीम इंडियाने ३ षटकांनंतर धावसंख्या ४ बाद १६२ धावा केल्या आहेत. केएल राहुल ४५ आणि रवींद्र जडेजा ५ धावांवर खेळत आहेत.

16:09 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: टीम इंडियाला सर्वात मोठा झटका! अर्धशतकानंतर किंग कोहली क्लीन बोल्ड

टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहली २९व्या षटकात बाद झाला. पॅट कमिन्सने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटला क्लीन बोल्ड केले. कोहलीने ६३ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

सध्या टीम इंडियाची धावसंख्या ४ बाद १४८ धावा झाली आहे.

15:58 (IST) 19 Nov 2023
IND vs AUS Final: विराट कोहलीने झळकावले विश्वचषकातील पाचवे अर्धशतक

विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात पाचवे अर्धशतक झळकावले आहे. विराटने ५६ चेंडूचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांवर खेळत आहे. भारतीय संघाने २६ षटकानंतर ३ बाद १३५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर केएल राहुल ५८ चेंडूत २८ धावांवर खेळत आहे.

World Cup 2023 Final India vs Australia Highlights : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या आणि अंतिम सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता.