WC 2023 Latest Marathi News : ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ट्रेव्हिस हेडने भारताविरोधात खेळताना १३७ धावांची खेळी केली. यानंतर विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या संघाला देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियातल्या प्रसार माध्यमांनी भारतावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतावर नेमकी काय टीका होते आहे?

विश्वचषक स्पर्धेत भारताने १० सामने जिंकले होते. पण अंतिम सामन्यात त्यांना जिंकता आलं नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचं कौतुक होतं आहे. मात्र ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी भारतीय संघातल्या खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी लिहिलं आहे की पॅट कमिन्स आणि त्याच्या टीमचा विजय त्यांना समजलाच नसेल कारण जेव्हा त्यांना विश्वचषक हाती देण्यात आला तेव्हा संपूर्ण मैदान रिकामं झालं होतं.

द क्रॉनिकलने काय म्हटलंय?

द क्रॉनिकल या वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियाच्या विजयाची बातमी दिली आहे त्यात असं म्हटलं आहे की भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यात खेळभावना दिसली नाही. ज्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हाती विश्वचषक दिला गेला तेव्हा भारतीय खेळाडू आतून दुखावलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे जाणवत होतं. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्वचषक घेऊन तो क्षण साजरा करत होते तेव्हा भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडे आणि त्या सोहळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. याला खेळभावना म्हणतात का? असाही प्रश्न द क्रॉनिकलने विचारला आहे.

हेराल्ड सनचीही टीका

यानंतर ‘हेराल्ड सन’ने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची प्रतिक्रिया छापली आहे. पॉटिंग म्हणाला जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती त्याचा भारतावरच उलट परिणाम झाला. गेल्या महिन्यात खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानला नमवलं आणि सात गडी राखून विजय मिळवला त्याच मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ही खेळपट्टी अपेक्षेपेक्षा कमी वेगवान होती. त्यावर अपेक्षेपेक्षा चेंडू कमी फिरला. मात्र प्रत्येक खेळाडूने खेळपट्टीशी जुळवून घेत चांगली गोलंदाजी केली.

द एजने काय म्हटलं आहे?

द एजने लिहिलं आहे की ९० हजारांहून अधिक भारतीय प्रेक्षक असलेल्या नरेंद्र मोदी मैदानात विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर फक्त ऑस्ट्रेलियाच्या ११ खेळाडूंचाच आवाज ऐकू आला. कोहलीचा बाद करुन कमिन्सने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या मार्गावर आणलं आणि त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन या दोघांनी १९२ धावांची भागिदारी केली आणि विजय खेचून आणला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पसरलेली शांतता ही कमिन्स आणि त्याच्या संघातील खेळाडूंसाठी आनंदाची गोष्ट ठरली.

द संडे मॉर्निंग हेराल्डने लिहिलं, ‘कमिन्सने भारताविरूद्ध विश्वचषक जिंकण्याबाबत म्हटलं की – हे क्रिकेटचं शिखर आहे.’ वृत्तपत्रात छापल्यानुसार, कर्णधार पॅट कमिन्सला वाटतं की, भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकणं ही आपल्या संघाची सर्वांत मोठी कामगिरी आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia icc world cup 2023 final australian media reacts on host india called unsporting scj