– नामदेव कुंभार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हार्दिक पांड्याचं नवीन रुप पाहून सर्व क्रिडाप्रेमींना सुखद असा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या मोठी फटकेबाजी करु शकतो हे सर्वांना माहित होतं. मात्र, जबाबदारीनं फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्याची किमया त्यानं साधली. त्याच्या या नव्या अवतारामुळे हार्दिक पांड्याची धोनीसोबत तुलना होऊ लागली आहे. धोनीसारखाच मॅचविनर फिनिशर भारताला मिळल्याच्या प्रतिक्रिया क्रीडा विश्वातून येत आहेत. पांड्याची तुलना आताच धोनीशी करणं योग्य नाही. हे पांड्यालाही आवडणार नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील जबाबदारीनं केलेली फलंदाजी म्हणजे हार्दिक पांड्या एक महान क्रिकेटपटू होत असल्याच्या पाऊलखुणा आहेत, असं म्हणता येईल. धोनीची जागा घेण्यासाठी हार्दिक पांड्याला आणखी मोठा पल्ला पार करायचा आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात फिनीशरची भूमिका कोण पार पाडणार? हा प्रश्न अनेकदा पडला. या एका कारणामुळे भारतीय संघानं अनेकदा सामनाही गमवला. प्रतिभा असतानाही हार्दिक पांड्या बेजबाबदार फटके मारुन आपली विकेट फेकत होता. लॉकडाउनमध्ये हार्दिक पांड्यानं आपल्या कुमकुवत बाजूवर काम केलं. आपल्यात काय कमी आहे आहे. संघाला सध्या कशाची गरज आहे आहे. या गोष्टीचा विचार केला अन् त्यावर अमंलबजावणी केली. आपल्या चुका शोधून दुरुस्त करतो तोच खेळाडू भविष्यात मोठा होतो. हा इतिहास आहे. याला सचिन, विराट आणि धोनीसुद्धा चुकलेले नाहीत. यांनीही आपल्या चुकांवर काम केलं. आज त्यामुळेच जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा बोलबाला आहे. तो नेहमीच आपल्या चुकांवर काम करत असतो. हार्दिक पांड्यानेही तेच केलं.

(आणखी वाचा : रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का? )

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर गोलंदाजी करु शकत नसलेल्या पांड्याला संघात स्थान देऊ नये, असं अनेक दिग्गज आणि क्रिडाप्रेमींना वाटत होतं. मात्र, मर्यादित षटकांच्या मालिका संपता संपता हार्दिक पांड्यानं स्वत:मधील प्रतिभा दाखवून दिली. एकहाती सामने फिरवले. हारलेला सामना खेचून आणला. संकटात सापडलेल्या भारतीय संघाला बाहेरही काढलं. हार्दिक पांड्या सध्या एक परिपक्व खेळाडू झालेला दिसतोय. मात्र, इतक्यातच त्याची धोनीशी होणारी तुलाना मनाला खटकतेय? कारण धोनीला धोनी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सहजासहजी धोनी तयार झाला नाही. सुरुवातीच्या सामन्यात धोनीचं अपयश पाहिल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही. धोनीनं स्वत: वर केलेली मेहनत हार्दिक पांड्याला करावी लागणार आहे.

भारतीय संघाकडे पांड्याच्या तोडीचा दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. जाडेजा आणि हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघात फिनिशरची भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीमुळे पांड्याला दुसरा धोनी म्हटलं जातं आहे. पण मला वाटतेय पांड्याची आताच धोनीशी तुलना नको. धोनीने जवळपास १० वर्षांपेक्षा जास्त भारतीय संघासाठी फिनीशरची भूमिका यशस्वी पार पाडली आहे. युवराज-धोनीनंतर भारतीय संघाकडे हार्दिक-जाडेजा ही विस्फोटक जोडी आहे. विराट कोहलीच्या मते हार्दिक सध्या आपली भूमिका व्यवस्थित पार पाडत आहे. ऑस्ट्रेलयाचे कोच जस्टिन लँगर यांनाही हार्दिकची फलंदाजी पाहून धोनीची आठवण झाली. हार्दिक धोनीची जागा भरत असला तरी त्याच्यासारखा फिनिशर होण्यासाठी अद्याप खूप कालावधी आहे. पांड्याला आपल्या फिटनेसवरही फलंदाजीइतकच लक्ष द्यावं लागणार आहे. पुढील तीन-चार वर्षात हार्दिक पांड्या हे नाव जागतिक क्रिकेटमध्ये झालेलं असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पांड्याच्या कामगिरीनं ग्लोबल क्रिकेटर होण्याचं दार ठोठावलं आहे. हार्दिक पांड्यानं फिनिशरची भूमिका मोठ्या कालावधीपर्यंत पार पाडल्यास नक्कीच म्हणता येईल भारतीय क्रिकेटला आणखी एक धोनी मिळाला आहे. मात्र, सध्या पांड्याची तुलना धोनीसोबत करणं योग्य नाही. एक गोष्ट मात्र खरी आहे. पांड्या आणि जाडेजा या जोडगोळीमुळे भारतीय संघाची फलंदाजी खोलवर गेली आहे.

(namdeo.kumbhar@loksatta.com)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia india tour australia dhoni hardik pandya spaical blog by namdeo kumbhar nck