India Tour of Australia 2025-26: सध्या सगळीकडे आयपीएल २०२५ च्या सामन्यांची चर्चा सुरू आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी (३० मार्च) आपल्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले, जे १० ऑगस्टपासून सुरू होईल. जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौरा पूर्ण केल्यानंतर काही आठवडे, ऑस्ट्रेलिया उत्तर ऑस्ट्रेलियातील डार्विन, केर्न्स आणि मॅके येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मॅके प्रथमच ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे यजमानपद भूषवणार आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. टीम इंडिया १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान २१ दिवसांत एकूण ८ सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण ३ सामने खेळले जातील तर ५ सामने टी-२० मालिकेत खेळले जातील. यानंतर २१ नोव्हेंबरपासून ऍशेस २०२५०२६ सुरू होईल. ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. व्हाईट बॉल मालिकेतील आठ सामने ऑस्ट्रेलियातील ८ शहरांमध्ये खेळवले जातील. वनडे मालिकेतील तिन्ही सामने पर्थ, ॲडलेड आणि सिडनी येथे होणार आहेत. तर टी-२० मालिकेचे सामने कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (३ वनडे, ५ टी२०) मालिकेचे वेळापत्रक

१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय, पर्थ स्टेडियम
२३ ऑक्टोबर: दुसरी वनडे, ॲडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय, सिडनी (
२९ ऑक्टोबर: पहिला T20I, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरी T20I, MCG
२ नोव्हेंबर: तिसरा T20I, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा T20, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: ५वा T20I, गाबा

रोहित-विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत चर्चा होती. त्या कसोटी मालिकेबरोबरच या दोन्ही दिग्गजांचा हा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौराही होता, अशी चर्चा होती. पण, आता पांढऱ्या चेंडूच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने त्यांच्या पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

विराट आणि रोहित दोघांनीही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र या दोघांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड होऊ शकते. रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधारही आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो भारतीय संघाचा कर्णधार असेल, अशी अपेक्षा आहे.