दोन सलग पराभवांमुळे एकीकडे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना सोमवारी संघ व्यवस्थापनाच्या एका धक्कादायक निर्णयामुळे साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. संघ व्यवस्थापनाच्या आज्ञांचे पालन न केल्याप्रकरणी हा आसूड उगारण्यात आला असून, उपकर्णधार शेन वॉटसनसह तीन अव्वल खेळाडूंची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
हैदराबादच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने एक डाव आणि १३५ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी कशी उंचावेल, याचे सादरीकरण करायला सांगितले होते. परंतु अष्टपैलू वॉटसन, फलंदाज उस्मान ख्वाजा, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सन हे चार खेळाडू सादरीकरण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सादरीकरण न केल्याबद्दल या चौघांवर संघातून वगळण्याची नामुष्की ओढवली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे. यातच यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड दुखापतीमुळे मायदेशी परतणार असल्याचे वृत्त ताजे असतानाच या चार खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवड करताना ऑस्ट्रेलियाकडे फक्त १३ खेळाडूच उपलब्ध असतील.
‘‘चार खेळाडूंना संघाची शिस्त पाळता आली नाही, त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा रूबाब आहे. जेव्हा हा संघ जगातील सर्वोत्तम संघ असतो, तेव्हा वागणुकीद्वारेसुद्धा हा आदर्शवाद जोपासता यायला हवा,’’ असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितले. ‘‘ते चार खेळाडू माझ्या अपेक्षांची पूर्तता करू शकले नाही. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यासाठी त्यांची निवड करता येणार नाही,’’ असे स्पष्टीकरण त्यांनी पुढे दिले.

‘‘हैदरबादच्या पराभवानंतर संपूर्ण संघ खचला आहे. मालिकेत परतण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारावे लागतील, याची आम्ही चर्चा केली. सांघिकदृष्टय़ा ऑस्ट्रेलियाचा संघ कुठे कमी पडतोय, याची आम्हाला जाणीव होती. परंतु मी प्रत्येकाला वैयक्तिक सादरीकरण करायला अखेरीस सांगितले होते. पुढील दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ कसा परतेल, हे मांडण्यासाठी तांत्रिक, मानसिक आणि सांघिक हे तीन मुद्दे प्रत्येकाच्या सादरीकरणात अपेक्षित होते. परंतु हकालपट्टी करण्यात आलेल्या खेळाडूंना सादरीकरण करणे महत्त्वाचे वाटले नाही. त्यामुळे संघात शिस्त राहण्याच्या हेतूने त्यांना शिक्षा करणे क्रमप्राप्त होते.’’
– मिकी आर्थर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक

ब्रॅड हॅडिनला पाचारण
यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडच्या उजव्या गुडघ्याला शनिवारी बास्केटबॉल खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे मोहालीच्या तिसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता मावळली आहे. या पाश्र्वभूमीवर यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन भारताकडे रवाना झाला आहे.
मोहालीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु त्यांचा भारतात फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन त्यांच्यासोबत नसेल. तिसऱ्या क्रमांकाला फिल ह्युजेस अद्याप न्याय देऊ शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजाला संधी मिळू शकली असती, परंतु ती शक्यता आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे ह्युजेसलाच आपली कामगिरी दाखविण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. हकालपट्टी करण्यात आलेला चौथा खेळाडू मिचेल जॉन्सन मालिकेतील एकाही कसोटीत खेळू शकलेला नाही.

तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध खेळाडू : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ईडी कोवन, फिलिप ह्युजेस, मोझेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, झेव्हियर डोहर्टी, नॅथन लिऑन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक)

Story img Loader