ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेसाठी भारतात आहे. या मालिकेसाठी भारतात येण्याच्या आधीपासूनच ऑस्ट्रेलियाचा संघ चर्चेत आहे. या चर्चेचं सर्वात मोठं कारण म्हणचे कांगारुंचं सराव सत्र. भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय खेळपट्टीवर सरावाचा अनूभव घेता यावा यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मायदेशातच आपल्या खेळाडूंसाठी फिरकीला अनुकूल अशा खेळपट्ट्या तयार केल्या. या खेळपट्ट्यांवर कांगारूंनी जोरदार सराव केला.
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अश्विनसारखी अॅक्शन आणि गोलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजाला त्यांच्या नेट्समध्ये बोलावलं. या गोलंदाजाविरोधात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सराव केला. परंतु नागपूर कसोटीत त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळाले नाहीत. आता उभय संघांमधला दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन विचित्र पद्धतीने सराव करताना दिसले.
नागपूर कसोटीत भाराताच्या फिरकीपटूंसमोर गुडघे टेकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु हे काम फारसं सोपं नसेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फिरकीपटूंविरोधात जोरदार सराव केला. दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावर १५ फेब्रुवारी रोजी दोन ऑस्ट्रेलियन फलंदाज विचित्र पद्धतीने सराव करताना दिसले.
हे ही वाचा >> ICC चं चाललंय काय? ६ तासांत हिरावलं भारताचं क्रमवारीतलं अव्वल स्थान, ‘हा’ संघ नंबर १
स्मिथ-लाबूशेनचा विचित्र सराव
ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार फलंदाज स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे दोघे त्यांच्या फलंदाजीसह सरावासाठी ओळखले जातात. हे दोन्ही फलंदाज अनेकदा एकत्र सराव करतात. बुधवारी फिरोज शाह कोटलाच्या खेळपट्टीवर हे दोघे विचित्र पद्धतीने सराव करत होते. हे दोन्ही फलंदाज एकाच वेळी एकाच गोलंदाजासमोर उभे राहून फलंदाजी करत होते. लाबूशेन स्टम्पसमोर उभा राहून तर स्मिथ स्टम्पच्या मागे उभा राहून फलंदाजी करत होता. स्वतंत्र पत्रकार भरत सुन्दरेशन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या सरावाचे फोटो शेअर केले आहेत.