भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आगामी टी-२० सामन्यातून पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झाली. दुखापतीमुळे नेहराला अनेकदा मैदानाबाहेर राहावे लागले. यावर्षीच्या सुरुवातीला नेहरा इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला होता. त्यानंतर आयपीएल सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर राहावे लागले.
टी-२० सामन्यातील निवडीनंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहरा म्हणाला, भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय ड्रेसिंगरुममधील प्रत्येकाला माझे महत्त्व माहिती आहे. कर्णधार आणि निवड समितीला माझ्यावर विश्वास असल्यामुळेच मला संधी मिळाली.

यावेळी नेहराला आगामी काळातील उद्दिष्टांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, या वयात दीर्घकालीन उद्दिष्ट ठेरवणे अशक्य आहे. त्यामुळे मैदानात उतरलेला प्रत्येक सामन्यानुसार चांगली कामगिरी करण्यावर अधिक भर देण्याला प्राधान्य देईन.
भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आशिष नेहराला दुखापतीमुळे अनेक सामन्यांना मुकावे लागले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्याने आपल्यावर तब्बल १२ शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले होते. आशिष नेहराने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-२० सामन्यात नेहरा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.