मोहाली :आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या रंगीत तालमीला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला आता एका महिन्याहूनही कमी कालावधी शिल्लक असल्याने या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताने सर्व प्रमुख खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. केवळ काही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात येणार आहे.
याच महिन्यात झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. या स्पर्धेत विराट कोहली वगळता भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. विशेषत: मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर सूर्यकुमार यादवने एक अर्धशतक केले, तर हार्दिक पंडय़ाने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी करून भारताला सलामीचा सामना जिंकवून दिला. त्यानंतर मात्र त्यांचा खेळ खालावला. तसेच रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे दिनेश कार्तिकला वगळून डावखुऱ्या ऋषभ पंतला संघात स्थान देण्याचा भारताने निर्णय घेतला. परंतु, पंतला सूर गवसला नाही. दीपक हुडालाही फारसे चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला मधल्या फळीची चिंता असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली आहे. तसेच मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस आणि मिचेल मार्श हे प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे या मालिकेला मुकणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाकडे सामने जिंकवून देणाऱ्या खेळाडूंची मोठी संख्या आहे.
बुमरा, हर्षलच्या पुनरागमनाचा दिलासा
जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल हे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकले व भारताला त्यांची उणीव भासली. मात्र, आता दुखापतींमधून सावरल्यानंतर त्यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात बुमरा, हर्षल आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान त्रिकुट खेळण्याची शक्यता आहे. यजुर्वेद्र चहल फिरकीची धुरा सांभाळेल. दुसऱ्या फिरकीपटूच्या स्थानासाठी अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात स्पर्धा आहे.
संघ
* भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमरा, दीपक चहर, उमेश यादव.
* ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शॉन अॅबट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, नेथन एलिस, डॅनियल सॅम्स, अॅश्टन एगर, अॅडम झ्ॉम्पा.
* वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी