क्रिकेटच्या तीन्ही प्रकारामध्ये सध्या अफलातून खेळत असलेल्या विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने स्तुतीसमुने उधळली आहेत. कोहली हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे, असे स्टार्कने म्हटले आहे. विशेष म्हणजे पर्थमधील दुसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन सोबत कोहलीची बाचाबाची झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनसह अनेक माजी खेळाडूंनी विराटवर टीका केली. पण आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना कोहली सोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या स्टार्कने विराट कोहली हा उत्कृष्ट खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
पर्थ कसोटीदरम्यान मैदानावर घडलेल्या प्रकारावरून मिचेल स्टार्कने विराट कोहलीचे समर्थन केले आहे. विराट सोबत मी आयपीएलचे अनेक सामने खेळले आहेत. तो कर्णधार म्हणून सर्वोत्कृष्ट आहे. सोबतच तो एक शानदार खेळाडू आहे, असे स्टार्कने म्हटले. रॉयल चलेंजसने २०१४ मध्ये स्कार्टला खरेदी केले होते. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आरसीबीने स्टार्कला सोडले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ असे बरोबरीत आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला असता, कोहली-रहाणे-पुजाराचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीयेत. विराटने पर्थ कसोटीत शतकी खेळी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची योग्य साथ लाभली नाही. त्यातच मुंबईकर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. पृथ्वीच्या जागी मयांक अग्रवालला संघात जागा देण्यात आली आहे. याचसोबत हार्दिक पांड्यानेही संघात पुनरागमन केलं आहे, त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.