साखळीतील अंतिम सामन्यात दमदार कामगिरीसह बाद फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य

पहिल्या सामन्यातील मोठा विजय आणि दुसऱ्या सामन्यात अटीतटीच्या संघर्षांनंतरही पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला थोडासा धक्का बसलेला आहे. मात्र गटसाखळीतील अंतिम लढतीत बहारिनविरुद्ध विजय मिळवत थेट बाद फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

बहारिनचा संघ जागतिक क्रमवारीत सध्या ११३व्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ १६ स्थानांनी आघाडीवर म्हणजे ९७व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे. परंतु प्रत्यक्षात भारतीय संघ सोमवारी कसा खेळ करतो, त्यावरच सामन्याचे भवितव्य निश्चित होणार आहे. त्यामुळे १९८४ आणि २०११ साली हुकलेली बाद फेरी गाठण्याची संधी यंदा मिळवायची असेल, तर भारताला त्यांचा अव्वल खेळ करून दाखवावा लागणार आहे. शारजाच्या मैदानावर भारतीय संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. १९५१ ते ६४च्या भारतीय फुटबॉल सुवर्णयुगाला पुन्हा परत आणण्यासाठी भारतीय कर्णधार सुनील छेत्रीलादेखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. भारतीय संघाला १९६४मधील आशिया चषकात उपविजेतेपद मिळाले होते. पण त्यावेळी साखळी आणि बाद फेरी अशा प्रकारे नव्हे, तर राऊंड रॉबिन पद्धतीने सामने झाले होते.

भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध गोल करण्याच्या अधिक संधी मिळवल्या होत्या. मात्र त्यांचे गोलात रूपांतर करण्यात उणीव राहून गेली, तर अमिरातीने कमी संधींमध्येदेखील दोन गोल केले. तसेच अधिकाधिक काळ चेंडूचा ताबा त्यांच्याकडे ठेवला होता. त्यामुळे भारतीय संघाला आता खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे. अर्थात भारतीय संघ बहारिनविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तरीदेखील बाद फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठी संयुक्त अरब अमिराती संघाला थायलंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवावा लागेल. म्हणजे हा मार्ग जर-तरचा ठरणार आहे किंवा तृतीय स्थानावर राहून बाद फेरीसाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते. कारण यंदा सहा गटांपैकी तृतीय स्थानांवर राहणारे चार संघदेखील बाद फेरीत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे सोमवारी भारत आणि थायलंड हे दोघेही सामने हरले तरी समान गुण असूनही भारत तृतीय स्थानावर राहणार आहे. कारण भारताने पहिल्या सामन्यात थायलंडला हरवले होते.

अर्थात भारतीय संघ बहारिनविरुद्ध जिंकण्याच्या इष्र्येनेच मैदानात उतरणार आहे. २०११मध्ये भारताला बहारिनकडून २-५ असा पराभव स्वीकारूनच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार करूनच भारतीय संघ ही लढत खेळणार आहे. भारताला बहारिनविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला तरी चालणार आहे, तर बहारिनला विजय अत्यावश्यक आहे. ‘क’ आणि ‘ड’ गटातील तळाच्या दोन्ही संघांनी अद्याप त्यांची खाती उघडलेली नाहीत. तसेच त्यांचा गोलफरकदेखील ऋणमध्ये असून भारताचा गोलफरक अधिक एक असा आहे. मध्यफळीतील कमकुवतपणा अमिरातीच्या सामन्यात उघडा पडला.

४-४-२  रणनीती

भारताने साखळीतील प्रारंभीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ४-४-२ अशीच रणनीती आखली होती. त्यात एकदा यश आणि एकावेळी अपयश आले असले तरी भारत बहारिनविरुद्ध पुन्हा त्याच रणनीतीने खेळण्याची शक्यता आहे.

Story img Loader