ग्वाल्हेर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या वेगाने सनसनाटी निर्माण करणाऱ्या वेगवान गोलंदाज मयांक यादवसह भारतीय संघात संधी मिळालेल्या युवा खेळाडूंना आपली तंदुरुस्ती आणि कौशल्य दाखवण्याची संधी आज, रविवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश संघाविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतून मिळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेर येथे होणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मयांक यादव आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज, अष्टपैलू नितीश कुमार, तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा अशा भविष्यातील ताऱ्यांना एकाच वेळी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आता पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात अंतिम अकरात स्थान मिळाल्यास हे खेळाडू त्याचा कसा फायदा घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कसोटी मालिकेत वर्चस्व राखल्यानंतर आता असेच यश ट्वेन्टी-२० मालिकेत मिळवण्याची जबाबदारी या युवा, नव्या दमाच्या खेळाडूंवर असणार आहे.
हेही वाचा >>> IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
‘आयपीएल’मध्ये ताशी १५० किमीहूनही अधिक वेगाने चेंडू टाकण्याच्या क्षमतेने मयांक एकदम चर्चेत आला होता. मात्र, त्यानंतर स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. दुखापतीतून सावरल्यावर सहसा देशांतर्गत स्पर्धेत खेळल्यानंतर खेळाडूसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडतात. मात्र, मयांक याला अपवाद ठरला आहे. त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आता आपल्या गुणवत्तेबरोबरच तंदुरुस्ती सिद्ध करण्याचे मोठे दडपण मयांकवर राहणार आहे.
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. तो रवी बिष्णोईच्या साथीने फिरकीची धुरा सांभाळणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे, बांगलादेशला अनुभवी शाकिब अल हसनविनाच उतरावे लागणार आहे. शाकिबने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे बांगलादेशसमोर त्याची पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान असेल.
● वेळ : सायं. ७ वा.
● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा अॅप
© The Indian Express (P) Ltd