आशिया चषक विजेतेपदाला गवसणी घालून आशियाई खंडातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ हे बिरूद सार्थ ठरवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताला दुखापतीने त्रस्त असलेल्या बांगलादेशच्या संघाचे आव्हान असेल. गेल्या काही वर्षांत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील लढती अधिक रंगतदार होतात. त्यामुळे ही लढतसुद्धा क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरण्याची शक्यता आहे.

आशिया चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्येच लढत होणार असे मानले जात होते. परंतु बुधवारी बांगलादेशच्या संघाने दुखापतींचे आव्हान झुगारत पाकिस्तानला हरवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. कागदावर भारतीय संघ बांगलादेशपेक्षा अधिक सरस आहे. त्यामुळे सलग सातव्यांदा भारतीय संघ जेतेपदावर दावा करू शकतो, तर बांगलादेशने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचा निर्धार केला आहे.

नियमित कर्णधार आणि फलंदाजीचा आधारस्तंभ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक जिंकल्यास पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेकडे वाटचाल करताना भारतासाठी महत्त्वाचे असेल. इंग्लंडमधील कसोटी मालिकेत १-४ असा मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर जिंकलेला आशिया चषक त्या जखमेवर फुंकर घालण्याचे कार्य करू शकेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ वर्चस्वपूर्ण कामगिरी बजावतो, मात्र परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये तितका खेळ उंचावला जात नसल्याची उणीव समोर येत आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पाच नियमित खेळाडूंना विश्रांती दिली होती. परंतु अफगाणी संघाने तो सामना बरोबरीत (टाय) राखला. आता अंतिम सामन्यात पुन्हा महत्त्वाच्या खेळाडूंना त्यांचे स्थान देण्यात येईल. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शिखर धवन ही सलामी जोडी पुन्हा फटकेबाजीसाठी परतेल. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

दुबईतील धिम्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी २४० धावांचे आव्हानसुद्धा कठीण जात असल्याचे सिद्ध होत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव सामन्यात भारताच्या मधल्या फळीची चाचपणी झाली होती. लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी शतकी सलामी नोंदवल्यावरसुद्धा भारताच्या मधल्या फळीला अपेक्षित फलंदाजी करता आली नव्हती.

मुस्तफिझूर रेहमान, रुबेल हुसैन आणि मश्रफी मोर्तझा यांचा समावेश असलेला बांगलादेशचा गोलंदाजीचा मारा भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरू शकेल. मुस्तफिझूरच्या माऱ्यात वैविध्य आहे, तर मश्रफीकडे अनुभवाची शिदोरी आहे.

बांगलादेशची फलंदाजी प्रामुख्याने मुशफिकर रहिमवर अवलंबून आहे. कठीण परिस्थितीत संघाला सावरण्यात रहिम आणि महमदुल्ला रियाध वाकबदार आहेत. मात्र त्यांना जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीच्या माऱ्याचे आव्हान असेल.

रोहित-शिखरवर भारताची मदार

भारताच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने रोहित (२६९ धावा) आणि शिखरवर (३२७ धावा) असेल. अंबाती रायुडू सातत्याने फलंदाजी करीत आहे. मात्र संघाला विजयरेषेपर्यंत तो अद्याप पोहोचवू शकलेला नाही. केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी मधल्या षटकांमध्ये धावांसाठी झगडताना आढळत आहेत. धोनीच्या फलंदाजीची मोठी चिंता भारताला जाणवत आहे. परंतु धोनी अंतिम सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे.

बांगलादेशला दुखापतीची चिंता

बांगलादेशचा महत्त्वाचा फलंदाज तमिम इक्बाल हाताला झालेल्या फ्रॅक्चरमुळे खेळू शकणार नाही. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या बोटाला दुखापत झाली आहे. या स्पध्रेनंतर त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे ३० सप्टेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही.

संघ

  • भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल, दीपक चहर.
  • बांगलादेश: मश्रफी बिन मोर्तझा (कर्णधार), शकिब अल हसन, तमिम इक्बाल, मोहम्मद मिथुन, लिटन कुमार दास, मुशफिकर रहिम, अरिफूल हक, महमदुल्ला रियाध, मोसादिक हुसैन सैकात, नझमूल हुसैन शांतो, मेहिदी हसन मिराझ, नझमूल इस्लाम अपू, रुबेल हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, अबू हैदर रॉनी.
  • सामन्याची वेळ : सायं. ५ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.