५१३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेश दिवसअखेर ६ बाद २७२; पदार्पणात झाकीरचे शतक

चट्टोग्राम : बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसनने कसोटी पदार्पणात शतक झळकावले. मात्र, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली फिरकीपटूंनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजयासमीप पोहोचला आहे. भारताने दिलेल्या ५१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची चौथ्या दिवसअखेर ६ बाद २७२ अशी धावसंख्या होती. विजयासाठी त्यांना अजूनही २४१ धावांची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथ्या दिवशी बांगलादेशचे सलामीवीर झाकीर (२२४ चेंडूंत १०० धावा) आणि नजमुल हुसेन शांटो (१५६ चेंडूंत ६७) यांनी पहिल्या गडय़ासाठी १२४ धावांची भागीदारी रचली. मात्र, अखेरच्या दोन सत्रांत भारताला पुनरागमन करण्यात यश आले. भारताकडून अक्षर पटेलने ५० धावांत तीन बळी बाद केले. त्याला उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवत उत्तम साथ दिली.

भारताला पहिल्या सत्रात एकही बळी मिळवता आला नाही, मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तीन बळी मिळवले. यादरम्यान भारताने केवळ ५७ धावा दिल्या. चौथ्या दिवशी बांगलादेशने बिनबाद ४२ धावांच्या पुढे खेळताना उपाहारापर्यंत ११९ धावसंख्येपर्यंत मजल मारली. बांगलादेशने तिसऱ्या सत्रात ९६ धावा केल्या. या सत्रात कर्णधार शाकिब अल हसनने (नाबाद ४०) आक्रमक खेळ करत बांगलादेशच्या धावसंख्येत भर घातली. खेळ थांबला तेव्हा शाकिबसह मेहदी हसन मिराज (नाबाद ९) खेळपट्टीवर होता. झाकीरने पहिल्या दोन सत्रांत बांगलादेशची एक बाजू सांभाळली. मात्र, शतक पूर्ण झाल्यानंतर त्याची एकाग्रता भंग पावली. अक्षरच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने आपले शतक पूर्ण केले, पण पुढील षटकात अश्विनने त्याला माघारी पाठवले.

त्यापूर्वी उमेश यादवने शांटोला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर अक्षरने यासिर अलीला (५) माघारी पाठवत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. यानंतर कुलदीपने लिटन दासला (१९) बाद केले. अक्षरने मुशफिकूर रहीम (२३) आणि नुरुल हसनला (३) माघारी पाठवत बांगलादेशच्या अडचणीत भर घातली.

संक्षिप्त धावफलक 

भारत (पहिला डाव) : ४०४

बांगलादेश (पहिला डाव) : १५०

भारत (दुसरा डाव) : २ बाद २५८ डाव घोषित

बांगलादेश (दुसरा डाव) : १०२ षटकांत ६ बाद २७२ (झाकीर हसन १००, नजमुल हुसेन शांटो ६७, शाकिब अल हसन नाबाद ४०; अक्षर पटेल ३/५०, उमेश यादव १/२७)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh axar patel takes india closer towards victory in first test against bangladesh zws