भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून गुणगान

दिनेश कार्तिककडे कोणतीही परिस्थिती समर्थपणे हाताळण्याची क्षमता आहे. अनुभव आणि योग्य वेळी अचूक स्ट्रोक खेळण्याच्या क्षमतेमुळे अखेरच्या षटकांमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात तो वाकबगार आहे, अशा शब्दांत भारताचा कर्णधार रोहित शर्माने कार्तिकच्या फलंदाजीचे गुणगान गायले.

रविवारी यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिकने फक्त ८ चेंडूंत २९ धावांची खेळी साकारून भारताला बांगलादेशविरुद्ध अनपेक्षित विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना कार्तिकने जिद्दीने षटकार खेचत निदाहास करंडकावर भारताचे नाव कोरले. याबाबत रोहित म्हणाला, ‘‘या आधीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरसुद्धा कार्तिक आमच्यासोबत होता. मात्र त्याला खेळण्याची पुरेशी संधी मिळाली नव्हती. त्याच्या कर्तृत्वामुळे भविष्याकडे वाटचाल करताना त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार आहे.’’

‘‘कोणत्याही परिस्थितीत जबाबदारीने खेळण्याचे कसब कार्तिककडे आहे. मग त्याला कोणत्याही स्थानावर फलंदाजीला उतरवा. स्वत:वरील विश्वास ही त्याच्यातील सर्वात महत्त्वाची खुबी आहे. अशा प्रकारच्या खेळाडूची संघात नितांत आवश्यकता असते,’’ असे रोहितने सांगितले.

‘‘कार्तिकला फलंदाजीला उशिराने पाठवल्यामुळे तो समाधानी नव्हता. मात्र अखेरच्या षटकांमध्ये आत्मविश्वासाने खेळण्यासाठी सातव्या क्रमांकावर मला अनुभवी आणि कुशल फलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळेच मी कार्तिकवर ही जबाबदारी सोपवली,’’ असे रोहितने सांगितले.

रोहित म्हणाला, ‘‘मी बाद होऊन जेव्हा डगआऊटमध्ये बसलो होतो, तेव्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला न पाठवल्यामुळे कार्तिक नाराज असल्याचे मला लक्षात आले. परंतु मी त्याला शांतपणे समजावले की, अखेरच्या तीन-चार षटकांमध्ये सामना गांभीर्याने खेळणाऱ्या तुझ्यासारख्या खेळाडूची मैदानावर असण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातील कौशल्याची त्याला जाणीव करून दिली. आता विजयवीर झाल्यामुळे तो आनंदी आहे.’’

कार्तिकच्या खेळाविषयी रोहित म्हणाला, ‘‘अखेरच्या काही षटकांमध्ये दडपण न घेता सामना जिंकून देण्यासाठी आवश्यक असलेले फटके कार्तिक खेळू शकतो. रुबेल हुसेनच्या गोलंदाजीला त्याने जिद्दीने सामना केला. १८व्या आणि २०व्या षटकात मुस्ताफिझूर रेहमान गोलंदाजी करील, असे आम्हाला वाटत होते. त्याचा सामना करण्यासाठी अनुभवी खेळाडू मैदानावर असणे जिकिरीचे होते.’’

वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी या स्पध्रेत सर्वाधिक प्रत्येकी ८ बळी घेण्याची किमया साधली. स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळवणाऱ्या सुंदरच्या कामगिरीविषयी रोहित म्हणाला, ‘‘या संपूर्ण स्पध्रेत सुंदरने जादुई गोलंदाजी केली. नवा चेंडू त्याने उत्तमपणे हाताळला. पॉवरप्लेमधील दडपणाचीही तो तमा बाळगत नाही आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावांसाठी जखडून ठेवतो.’’

चहल, सुंदरची आगेकूच

युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. चहलने १२ स्थानांनी आगेकूच करताना दुसरे स्थान गाठले आहे. याचप्रमाणे सुंदरने १५१ स्थानांनी आगेकच करीत ३१वे स्थान मिळवले आहे. या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी निदाहास चषक स्पध्रेत प्रत्येकी ८ बळी मिळवले आहेत.

जीवनातील सर्वात संस्मरणीय क्षण !

भारताला विजेतेपद मिळवून देणे, हेच एकमेव ध्येय माझ्या डोळय़ांसमोर दिसत होते. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मी देशाला अजिंक्यपद मिळवून दिले. हा माझ्या जीवनातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे, असे यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने सांगितले.

निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात कार्तिकने भारताला शेवटच्या चेंडूवर विजयी केले. याबाबत तो म्हणाला, ‘‘प्रत्येक खेळाडू अशा क्षणाची वाट पाहात असतो. माझ्या जीवनात असा क्षण केव्हा तरी येईल हे मला माहीत होते. असा क्षण अंतिम फेरीत पाहायला मिळाला हेच माझे भाग्य आहे.’’

तो म्हणाला, ‘‘गेले वर्षभर माझी कामगिरी समाधानकारक झाली आहे. हे विजेतेपद मिळवण्यासाठी संघातील सर्वच खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. हे विजेतेपद माझ्या एकटय़ाचे नसून संघातील सर्व सहकारी तसेच मार्गदर्शक चमूचे आहे. जेव्हा मी मैदानावर फलंदाजीसाठी आलो तेव्हा प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याचेच माझे ध्येय होते. प्रतिस्पर्धी गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू टाकत होता, त्यानुसार टप्पा ओळखून मी उभे राहून खेळलो. आम्हाला श्रीलंकेतील प्रेक्षकांचाही भरपूर पाठिंबा मिळाला हे विसरून चालणार नाही. या सामन्याला खूप गर्दी होती, याचेच मला आश्चर्य वाटले.’’

Story img Loader